परंपरा खंडित होणार नाही; गणेशोत्सवाबाबत सार्वजनिक समन्वय समितीने मंडळांना केले 'हे' आवाहन

परंपरा खंडित होणार नाही; गणेशोत्सवाबाबत सार्वजनिक समन्वय समितीने मंडळांना केले 'हे' आवाहन


मुंबई : कोरोनाच्या विघ्नामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सव साजरा होणार की नाही, असा प्रश्न मंडळांना पडला आहे. मुंबईतील 127 वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ देऊ नका. साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. 

कोरोनाचे संकट आणखी किती काळ राहील, याबाबत काहीही सांगता येत नाही. मुंबई-पुण्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. कोरोनाचे विघ्न गणेशोत्सवापर्यंत दूर झाले, तरी ही साथ पुन्हा डोके वर काढू नये यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. राज्य सरकारच्या सर्व आदेशांचे पालन करावे, अशी सूचना समन्वय समितीने केली आहे. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी समन्वय समितीच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड्. नरेश दहीबावकर यांनी दिली. 

गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ देणार नाही. त्याचबरोबर नागरिकांची व कार्यकर्त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. गणेशोत्सवामुळे प्रशासनावरील ताण वाढणार याची खबरदारी घेणेही आवश्यक आहे. त्याप्रमाणे गणेशोत्सव मंडळांनी खबरदारी घ्यावी. वेळ पडल्यास गणपतीची प्रतिष्ठापना-पूजा मंडळांच्या कार्यालयात करू; पण बाप्पाचे आगमन होणारच. प्लेगची साथ असताना चित्रांचे पूजन करून गणेशोत्सव साजरा झाला होता, असे अॅड्. दहीबावकर यांनी सांगितले. कोरोनाच्या विषाणूंवर गणरायाच्या आगमनापर्यंत मात केल्यास पूर्वीप्रमाणेच उत्सव होईल. त्यावेळी योग्य खबरदारी घेतली जाईल, असेही ते म्हणाले. 

मंडळांनी जपले सामाजिक भान
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे देशाच्या व राज्याच्या बिकट परिस्थितीत सरकारच्या खांद्याला खांदा लावून लढली आहेत. मंडळांनी नेहमीच सामाजिक भान जपत नागरिकांना मदत केली आहे, असे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड्. नरेश दहीबावकर म्हणाले. कोरोनाच्या परिस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीला 35 लाखांची मदत दिली. यापुढे गणेशोत्सव मंडळे राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com