
ठाणे : घोडबंदर-गायमुख मार्गावरील खड्ड्यांच्या समस्येवरून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कानउघडणी केल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसांत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यासाठी सर्वप्रथम या मार्गावरील चाळण झालेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. एकही खड्डा राहता कामा नये आणि पुन्हा पडता कामा नये, या तत्वावर शुक्रवार (ता. ८) पासून तीन दिवस २४ तास या मार्गावर काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक विभाग ब्लॉक घेणार असून लवकरच यासंबंधीची अधिसूचना काढण्यात येणार आहे.