Mumbai : एमआयडीसी जलवाहिनीवर भराव टाकून अवजड वाहनांची वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Transport of heavy vehicles filling MIDC canal Water pipeline burst near Pale village

Mumbai : एमआयडीसी जलवाहिनीवर भराव टाकून अवजड वाहनांची वाहतूक

डोंबिवली - एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवर भराव टाकून त्यावरुन अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याचा प्रकार अंबरनाथ तालुक्यातील पाले गावात उघडकीस आला आहे. एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याच्या घटना गेल्या दोन तीन महिन्यांत वारंवार घडत असतानाच आता हा प्रकार समोर आल्याने एमआयडीसी प्रशासन याकडे गांर्भीयाने पाहत नसल्याचे दिसत आहे.

या अवजड वाहनांमुळे वाहिनीस धोका पोहोचण्याची शक्यता स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता याकडे एमआयडीसी अधिकारी लक्ष देणार का ? हे पहावे लागेल. एमआयडीसीमार्फत बारवी धरणातून विविध प्राधिकरणांना पाणी पुरवठा केला जातो.

बदलापूर पाईपलाईन रोडवरुन या जलवाहिन्यात जात असून या वाहिनींना टॅप मारुन पाणी चोरी, सर्व्हिस सेंटर, ढाब्यांसाठी पाणी वापरण्याचे प्रकार सर्रास घडतात. तसेच जलवाहिनी फुटून लाखो लीटर पाण्याची नासाडी देखील होत असते. काही दिवसांपूर्वीच हेदुटणे गावाजवळ पाईपलाईन फुटल्याची घटना घडली.

एमआयडीसी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता पाईप गंजून फाटल्याची बाब लक्षात आली. पाईपलाईनला लागून बांधकाम केले गेले असल्याने या पाईपला गंज लागला होता. एमआयडीसीने हे बांधकाम पाडून पाईप दुरुस्ती केली.

ही घटना ताजी असतानाच आता पाले गावाजवळ अजबच प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी काही गृह प्रकल्पांचे काम सुरु आहे. बांधकाम व्यावसायिकांनी मनमानी पद्धतीने प्रकल्पांसाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना मार्ग करुन देण्यासाठी पाईपलाईनवर चक्क भराव टाकत रस्ता तयार करण्यात आला आहे.

या अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे भविष्यात या ठिकाणी पाईपलाईनला धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक गावकऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली असून याविषयी ते एमआयडीसी प्रशासनाला पाठपुरावा करणार असल्याचे ग्रामस्थ मनोहर देसाई यांनी सांगितले.

एमआयडीसीच्या जलवाहिनी लगत अनेक हॉटेल चालकांनी, दुकानदारांनी बांधकाम केले आहे. हॉटेलमध्ये नागरिकांना येता यावे यासाठी वाहनीवर सिमेंटच्या पायऱ्या कोठे बांधण्यात आल्या आहेत. तर कोठे भराव टाकून रस्ता बनविण्यात आला आहे.

पालेगावाजवळ बांधकाम व्यावसायिकांनी देखील भराव टाकत रस्ता तयार केला. त्यावरुन चक्क अवजड वाहनांची वाहतूक देखील रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत केली जात आहे. ऐवढे सगळे उघड उघड सुरु असताना एमआयडीसी प्रशासन काय करत आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी अधिकारी रमेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मिटिंग मध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.