लागोपाठ दोन हत्यांमुळे तुर्भ्यात खळबळ  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

सीसी टीव्ही नसल्याने तपासात अडचणी 

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील इंदिरानगरमध्ये लागोपाठ दोन हत्येच्या घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेत अज्ञात त्रिकुटाने बोनसरी गावातील एका सुरक्षा रक्षकाची हत्या केली आहे; तर दुसऱ्या घटनेत अज्ञात मारेकऱ्यांनी 30 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. या दोन्ही हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. 

हेही वाचा - निर्भयाच्या नराधमांवर दररोज 50 हजारांचा खर्च, तुमचा मत काय?

तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात खाणीवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे गोविंद दास हे रविवारी रात्रपाळी करण्यासाठी कामावर गेले होते. त्या वेळी रात्री 11.30 च्या सुमारास तीन अज्ञात मारेकऱ्यांनी दास यांना लाकडी ठोकळ्याने बेदम मारहाण केली. दास यांच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक तेथे जमले; मात्र तोवर दास यांच्या डोक्‍यावर व डोळ्यावर गंभीर दुखापती झाल्या होत्या. त्यांना त्वरितच महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात नेले. तेथून त्यांना जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान सोमवारी (ता.22) सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

महत्त्वाची बातमी - नवी मुंबईच्या वेशीवर घडतोय हा प्रकार

या घटनेचा शोध पोलिस घेत आहेत, तोवरच बुधवारी (ता.22) सकाळी इंदिरानगर भागातील रहिवासी संतोष विठ्ठल कसबे (30) याची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याचे उघडकीस आले. मृत संतोष हा भाऊचा धक्का येथे मासेमारी करण्याचे काम करत होता. मात्र गत आठवड्यात त्याने ते काम सोडून तुर्भे परिसरात बिगारी काम करायला सुरुवात केली होती. सोमवारी सायंकाळी कामानिमित्त बाहेर गेलेला संतोष घरी परतलाच नाही. बुधवारी सकाळी 6 वाजता त्याचा मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणीत आढळून आला. संतोषच्या डोक्‍यावर जखमा झाल्या असून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातदेखील अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही हल्ल्यांतील आरोपींबद्दल कोणतीही माहिती अजून पोलिसांना मिळाली नसून हत्या झालेल्या परिसरांत सीसी टीव्ही नसल्याने पोलिसांना तपासादरम्यान अडचणी येत आहेत.  

web title : two consecutive killings at turbhe


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two consecutive killings at turbhe