त्यांना लागला नाद...गाडी दिसली की करायचे 'हे' काम!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

रस्त्यालगत उभ्या असलेल्या जड-अवजड वाहनांतील डिझेल चोरणाऱ्या टोळीतील दोघांना पनवेल पोलिसांनी अटक केली. राहुल, गिलानी अशी या डिझेल चोरट्यांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून एक चारचाकी जफ्त केली.

नवी मुंबई : रस्त्यालगत उभ्या असलेल्या जड-अवजड वाहनांतील डिझेल चोरणाऱ्या टोळीतील दोघांना पनवेल पोलिसांनी अटक केली. राहुल, गिलानी अशी या डिझेल चोरट्यांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून एक चारचाकी जफ्त केली. या दोघांसह त्यांच्या टोळीने पनवेल व आजूबाजूच्या परिसरात डिझेलचोरीचे अनेक गुन्हे केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ही बातमी वाचली का? काय आश्‍चर्य..? लक्ष्मीदर्शन झालं अन् यादीच नावेच नाही

औद्योगिकीकरणाचे मोठे क्षेत्र असलेल्या नवी मुंबई, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात जड-अवजड मालवाहू वाहने येत असतात. याचाच फायदा घेत या परिसरात काही दिवसांपासून डिझेलचोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गत 28 जानेवारी रोजी जेएनपीटी ते पळस्पे रोडलगत कुंडेवहाळ येथे रस्त्यालगत एक ट्रेलर उभा होता. या ट्रेलरच्या टाकीतून एका टोळीने पाईपच्या साह्याने 60 लिटर डिझेलची चोरी केली होती. त्या वेळी डिझेल चोरटे कारने पळून जाताना चालक नितीन लोखंडे यांनी त्यांचे छायाचित्र काढले होते. ट्रेलरचालक नितीन लोखंडे याने पनवेल शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. 

ही बातमी वाचली का? त्यांनी अनेकांना वाचवलं, अन्‌  त्यांनाच रुग्णालयात घेतलं नाही!

त्यानुसार पनवेल पोलिसांनी तपास करून राहुल आणि गिलानी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी डिझेलचोरीची कबुली दिली. त्यामुळे त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली. तसेच या चोरट्यांकडून 5 लाख रुपये किमतीची चारचाकी हस्तगत करण्यात आली. या टोळीने अशाच पद्धतीने डिझेलचोरीचे अनेक गुन्हे केले असण्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलिस तपास करत असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Diesel smugglers arrested in gang navi mumbai