नवी मुंबईत दोन पोलिस जखमी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

नवी मुंबई पोलिसांच्या चार्ली-1 मोबाईल व्हॅनला भरधाव कारची धडक बसली. या अपघातात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले.

नवी मुंबई  : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एपीएमसी मार्केट परिसरात गस्त घालणाऱ्या नवी मुंबई पोलिसांच्या चार्ली-1 मोबाईल व्हॅनला भरधाव कारची धडक बसली. या अपघातात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री माथाडी चौकात घडली. कारचालक गौरव तेलंगे (25) याला अटक केली आहे. व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

हे वाचा : पंतप्रधान उद्या देशाला संबोधित करणार 

गौरव हा उरणजवळच्या द्रोणागिरी नोडमध्ये राहतो. तो दारूच्या शोधात उरण येथून कोपरखैरणे येथे कारने आला होता. तो एपीएमसी मार्केटमधून पोलिसांची नजर चुकवून उरण येथे जात असताना त्याची चार्ली-1 व्हॅनला धडक बसली. पोलिस एपीएमसी पोलिस ठाण्याकडून तुर्भे रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात होते.

हे वाचा : डॉक्‍टर अभिनेता आणि पुन्हा डॉक्‍टर 

जोरदार धडक असल्याने पोलिस व्हॅन माथाडी चौकात उलटली. अपघातात व्हॅनमधील पोलिस नाईक अनिकेत घाडगे (32) आणि पोलिस हवालदार हेमंत गोसावी हे थोडक्‍यात बचावले. त्यांच्यावर नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार करण्यात आले. कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गौरव तेलंगे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच कार जप्त केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two policemen were injured in the accident.