Shivsena Row : उद्धव ठाकरेंचं बाळासाहेबांच्या पावलावर पाउलं; ओपनकारमध्ये केलं कार्यकर्त्यांना संबोधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Shivsena Row : उद्धव ठाकरेंचं बाळासाहेबांच्या पावलावर पाउलं; ओपनकारमध्ये केलं कार्यकर्त्यांना संबोधित

Uddhav Thackeray : शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. (Uddhav Thackeray Speech In Mumbai)

चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. तर या निर्णयाविरोधात ठाकरेगटाने लढाई तर आता सुरू झाली आहे असे म्हणत रणशिंग फुंकले आहे.

उद्धव ठाकरेंनी हे रणशिंग फुंगतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शैली वापरली आहे. १९६८ साली बाळासाहेबांना दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली होती.

त्यानंतर त्यांनी जीपच्या बोनेटवर उभं राहून शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी याच पावलावर पाउलं ठेवत मातोश्री बाहेर हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.

निवडणुकांच्या तयारीला लागा

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण पुन्हा एकजुटीने लढू. चोरांचा आणि चोरबाजाराचा नायनाट करू असे म्हणत शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. मात्र, शिवसेना संपवता येणार नाही. निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. माझ्या हातात काही नाही पण लढाई आता सुरु झाली असल्याचे ते म्हणाले.

‘धनुष्यबाण चोरणारे मर्द असतील.. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या.. मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते असं थेट आव्हान देत धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो असे ठाकरे म्हणाले. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला मात्र तो उताणा पडला. या चोरांनाही धनुष्यबाण पेलता येणार नाही.

मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून त्यांच्या छाताडावर उभा राहील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

आता डंख करायची वेळ आली आहे

आज महाशिवरात्र आहे उद्या शिवजयंती आहे, जणू काही या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलंय, धनुष्यबाण चोरलं गेलेलं आहे. पण ज्यांनी हे चोरलंय त्यांना हे माहिती नाही की त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेला मधाचा आस्वाद घेतला आहे पण त्यांना अद्याप मधमाशांचा डंख लागलेला नाही. तो डंख आता करायची वेळ आलेली आहे.