Unmasking Happiness | कोरोनानंतर हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या कार्यक्षमतेत घट

भाग्यश्री भुवड
Wednesday, 20 January 2021

पोस्ट कोव्हिड अर्थात कोरोनोत्तर समस्यांपैकी हृदयविकार ही समस्या ठरत आहे. संसर्गानंतर ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले, त्यात हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांचा अधिक भरणा होता.

मुंबई : पोस्ट कोव्हिड अर्थात कोरोनोत्तर समस्यांपैकी हृदयविकार ही समस्या ठरत आहे. संसर्गानंतर ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले, त्यात हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांचा अधिक भरणा होता. हृदयविकारांमध्ये तीन ते चार प्रकार होते. यात "मायोकार्डियाटिस' हा पहिला प्रकार होता. विषाणूमुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते; मात्र योग्य उपचारांनंतर संसर्ग कमी झाल्यास ही कार्यक्षमता पुन्हा मिळविताही येते. यातील दुसरा प्रकार "पल्मनरी एम्बोलिझम' रुग्णांमध्ये अधिक पाहायला मिळाला. यात हृदयाच्या विविध भागांत संसर्ग पसरतो. तिसऱ्या प्रकार हृदयविकाराचा झटका हा होय. कोरोना विषाणूमुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होऊन त्या धमन्यांमध्ये अडकतात. यात रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो. हे प्रमाण तरुणांमध्ये आढळले. केईएम रुग्णालयात या प्रकारातील एक ते दोन रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओग्राफी करून रक्ताच्या गुठळ्या कमी करणारी इंजेक्‍शन देण्यात आली होती. 

पाश्‍चिमात्य देशांतील रुग्णालयांत उपचार करून घरी सोडण्यात आलेल्या (डिस्चार्ज) 100 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यावरील उपचारानंतर करण्यात आलेल्या तपासण्यांत हृदयाची कार्यक्षमता पडताळण्यात आली. याच धर्तीवरील अभ्यास केईएम रुग्णालयातील डॉक्‍टरांनीही केला. त्यासाठी घरी सोडण्यात आलेल्या 150 रुग्णांची निवड करण्यात आली. त्यात गंभीर व सामान्य अशा दोन्ही रुग्णांचा समावेश होता. यात ज्यांना सहव्याधी आहे, अशा रुग्णांमध्ये हा त्रास दिसून आला. 

Unmasking Happiness | कोरोनामुक्त 80 टक्‍के रुग्णांमध्ये केसगळती; BMC रुग्णालयांत तक्रारींच्या संख्येत वाढ

कोरोनेत्तर त्रास जाणवणाऱ्या रुग्णांवर एन्जिओप्लास्टी केली जात आहे. याशिवाय आरटीपीसीआर ही केली जाते. त्यात कोव्हिडची लक्षणे न दिसल्यास ऍन्जिओप्लास्टीही केली जाते. रुग्णांच्या उपचार पद्धतीत बदल करण्यात आला होता. यात रुग्णांना तातडीने सेवा पुरवली गेली. 

उपचारपद्धतीमुळे जीवदान 
विषाणूमुळे शरीराच्या काही भागांत गुठळ्या तयार होतात. जर या गुठळ्या रक्तवाहिन्यांमध्ये झाल्या, तर त्या रक्तवाहिन्या बंद होतात. त्यातही फुप्फुसाला जोडलेली धमनी ही रक्तपुरवठा करते. ही गुठळीच त्या धमन्यांना बंद करते. त्यामुळे फुप्फुसाचा दाब वाढतो. त्यातून समस्या वाढायला सुरुवात होते; मग हायपोक्‍सिया, रक्तदाब कमी होतो, योग्य उपचार नाही झाला तर मृत्यू होतो; पण ज्या वेळेस या रुग्णांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला, त्यानंतर उपचारपद्धतीत बदल करून अनेकांना जीवदान देण्यात आले. 

 

युरोपात आढळलेला कोरोनाचा संकरावतार (स्ट्रेन) कदाचित वेगळा असू शकतो. भारतीयांची प्रतिकारशक्ती कदाचित जास्त चांगली आहे. ही कारणे महत्त्वाची ठरतात. 
- डॉ. चरण लांजेवार,
हृदयविकारतज्ज्ञ, केईएम रुग्णालय 

 

Unmasking Happiness Decreased efficiency in patients with coronary heart disease after corona

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unmasking Happiness Decreased efficiency in patients with coronary heart disease after corona