मुंबईत महिलांसाठी सुरु होणार 'ही' सुविधा, BEST च्या जुन्या बसेसचा असाही उपयोग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

  • मुंबईत महिलांसाठी मोबाईल स्वछतागृह 
  • वातानुकूलित स्वछतागृहात मिळणार हायटेक सुविधा 
  • बेस्टच्या जुन्या बस गाड्यांमध्ये स्वछतागृह सुरू करण्याचा प्रस्ताव 

मुंबईतील जागेचा अभाव लक्षात घेऊन मोबाईल स्वछतागृह सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यातील पाहिलं वातानुकूलित सुसज्ज मोबाईल स्वछतागृह लवकरच सुरू करण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे बेस्टच्या भंगारात निघालेल्या बसेसमध्ये हे मोबाईल स्वछतागृह सुरू होणार असून शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी याबाबतची मागणी केली होती.

मुंबईत सार्वजनिक स्वछतागृह आणि प्रसाधनगृहांची संख्या मागणीच्या तुलनेत फारच कमी आहे. जागेचा अभाव असल्याने गरज असतानाही पालिकेला स्वछतागृह उभारता येत नाही. यामुळे लोकांची फारच गैरसोय होते. त्याचप्रमाणे मुंबईतून नवी मुंबई, दहिसर, ठाण्याकडे जाणारे महामार्ग ही आहेत. हे महामार्ग पालिकेच्या मालकीचे नसल्याने या मार्गांवर स्वच्छतागृह उभारणे शक्‍य नाही.

हेही वाचा :  मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक..

 

मुंबईत येऊ घातलेल्या विविध प्रकल्पात आमही महिलांचा प्रामुख्याने विचार करतोय. स्वच्छतागृहांच्या कमतरतेमुळे महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अधिक सोई सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न  करतोय. महिलांसाठी असणाऱ्या मोबाईल स्वच्छतागृह सुरू करतांना आम्ही महिलांना प्राधान्य दिलं असून काम करणाऱ्या महिलांना याचा खूप फायदा होणार आहे.

- किशोरी पेडणेकर , महापौर 

 

यावर उपाय म्हणून अश्‍या ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहांचा पर्याय पालिकेने वापरावा अशी सूचना शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली होती. पडवळ यांच्या सुचनेनंतर मागील वर्षी तत्कालीन पालिका आयुक्तांनी मोबाईल स्वच्छतागृहांचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर यावर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले. 

कसे असेल मोबाईल स्वच्छतागृह 

मुंबईकरांची गरज लक्षात घेऊन सध्या प्रायोगिक तत्वावर केवळ एक मोबाईल स्वच्छतागृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्वच्छतागृह संपूर्ण वातानुकूलित असणार आहे. या  शौचालयासह, प्रसाधनगृह आणि वॉश बेसिनची सुविधा पुरवण्यात आली आहे. महिलांसाठी प्रसाधनगृहात काही वेळ विश्रांती घेण्यासाठी बैठक व्यवस्था ही करण्यात आली आहे. शिवाय या प्रसाधनगृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीनची देखील व्यवस्था असून महिला आपल्या बाळांना स्तनपान करू शकतील अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच स्वच्छतागृहाच्या दुसऱ्या बाजूला चहा आणि नाष्ट्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. 

 

मुंबईतून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर स्वच्छतागृहांची वानवा आहे.यामुळे प्रवाश्‍यांची आणि वाहन चालकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते.यामुळे अश्‍याअ ठिकाणी स्वच्छतागृह सुरू करण्याची मी मागणी केली असून बेस्टच्या जुन्या बसगाड्यांचा वापर करून मोबाईल स्वछतागृह सुरू केल्यास लोकांना निश्‍चित फायदा होईल.

- सचिन पडवळ, नगरसेवक  

 

महत्त्वाची बातमी :  आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात.. 

पाहिलं स्वछतागृह महिलांसाठी 

मुंबईत मोबाईल स्वच्छतागृहांना मोठी मागणी असली तरी सध्या प्रायोगिक तत्वावर केवळ एक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.स्वच्छतागृहांच्या अभावाने महिलांची कुचंबणा होत असल्याने यात महिलांना प्राधान्य देण्यात आलं असून महिलांसाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा यात देण्यात आल्या आहेत.पाहिलं मोबाईल स्वछतागृह हे महिलांची अधिक वर्दळ असणाऱ्या मारिन ड्राइव्ह वरील तारापोरवाला मत्स्यालय परिसरात सुरू करण्यात येणार आहे. 

सीएसआर फंडातून खर्च 

मुंबईत मोबाईल स्वच्छतागृह सुरू करण्यासाठी तीन कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.आपल्या सीएसआर फंडातून या कंपन्यांनी मोबाईल स्वच्छतागृह सुरू करण्यास तयारी दर्शवली आहे.असे असले तरी पालिकेने प्रायोगिक तत्वावर केवळ एक मोबाईल स्वच्छतागृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर महामार्गावर आणखी 15 ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृह सुरू करण्याचा विचार आहे. 

हेही वाचा :  स्पृहाला गेल्या काही महिन्यांपासून सतावतेय 'ही' भिती..
 

मोबाईल स्वच्छतागृहांसाठी बेस्ट बसचा वापर 

मोबाईल स्वच्छतागृहंसाठी भंगारात निघालेल्या बेस्ट बस गाड्यांचा वापर करण्याबाबत पालिका विचार करत आहे.दरवर्षी बेस्टच्या अनेक खराब बसेस भंगारात विकल्या जातात.या बस गाड्या विकत घेऊन त्यात मोबाईल स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे.यावर्षी 76 बस गाड्या भंगारात निघणार असून त्यात पालिकेने मोबाईल स्वछतागृहांचा प्रयोग राबवावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे. 

Webtitle : using old BEST bused BMC will create mobile washroom for women


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: using old BEST bused BMC will create mobile washroom for women