वाधवा पिता-पुत्र तुरुंगातून नजरकैदेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक (पीएमसी बॅंक) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राची तुरुंगातून सुटका करण्याचा आदेश बुधवारी (ता. 15) मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक (पीएमसी बॅंक) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राची तुरुंगातून सुटका करण्याचा आदेश बुधवारी (ता. 15) मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या दोघांना वांद्रे येथील निवासस्थानी पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले. दरम्यान, वाधवा यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असल्यामुळे पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. 

महत्वाची बातमी ः आयआयटीमध्ये रंगणार ‘कॉन्सर्ट फॉर कॉज’

पीएमसी बॅंक गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेले एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश व सारंग वाधवा यांनी हजारो कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिली आहे. वाधवा पिता-पुत्राची रवानगी तुरुंगातून नजरकैदेत केली जाणार असून, त्यांना समितीला सहकार्य करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत. त्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या दोन पोलिसांचा खर्चही वाधवा पिता-पुत्रांनाच करावा लागेल. 
सुमारे 4000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे पीएमसी बॅंक अडचणीत आली असून, रिझर्व्ह बॅंकेने खातेदारांच्या व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. याबाबत सरोथ दमानिया या खातेदाराने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर बुधवारी न्या. रणजीत मोरे आणि न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठाने 18 पानी निकालपत्र जाहीर केले. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 30 रोजी होणार आहे. यावेळी अहवाल दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने समितीला दिले आहेत. 

समितीची नियुक्ती 
वाधवा पिता-पुत्राच्या एचडीआयएल या कंपनीच्या मालमत्ता लवकरच लिलावाद्वारे विकण्यात येणार आहेत. याबाबत तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. निवृत्त न्यायाधीश एस. राधाकृष्णन या समितीचे अध्यक्ष असतील. मालमत्तांच्या लिलावानंतर पीएमसी बॅंकेच्या खातेदारांचे पैसे परत देण्यासाठी ही समिती काम करणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vadhva father sons get detension