esakal | वसईत काच कारखानदारांकडून 6 कोटी 17 लाखांची वीज चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity Robbery

वसईत काच कारखानदारांकडून 6 कोटी 17 लाखांची वीज चोरी

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : वसईतील (Vasai) अमाफ ग्लास टफ कंपनीने गेल्या 50 महिन्यात तब्बल 6 कोटी 17 लाख रुपयांची वीजचोरी (Electricity robbery) केल्याचा धक्कादायक प्रकार भरारी पथकाच्या धाडीत उघडकीस आला आहे. वीज मीटरवरील वीज वापराची नोंद (Meter reading details) रिमोटच्या साह्याने 90 टक्क्यांपर्यंत नियंत्रित करून वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले असून कारखान्याचे दोन भागीदार, जागामालक आणि वीजचोरीची यंत्रणा उभारून देणारा एकजण अशा चौघा जणांविरूद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल (Police FIR) करण्यात आला आहे. मुख्य कार्यालयाकडून ग्राहकाच्या वीज वापर विश्लेषणातुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा आणि अंमलबजावणी विभाग तसेच मुख्य अभियंत्यांच्या निर्देशानुसार भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा: साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या - रामदास आठवले

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वसईच्या कामन गाव परिसरातील अमाफ ग्लास टफ (गाळा क्रमांक एक, प्लॉट क्रमांक 3 व 4, युनिक इस्टेट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, आयेशा कंपाउंडजवळ, सर्वे क्रमांक 155) कंपनीचे भागीदार व सध्याचे वीज वापरकर्ते अब्दुल्ला आझाद हुजेफा व शब्बीर आसिर हुजेफा, जागेचे मालक प्रफुल्ल गजानन लोखंडे व वीजचोरीची यंत्रणा बसवून देणारा अज्ञात व्यक्ती अशा चार जणांचा समावेश आहे. भरारी पथकाने तपासणी केल्यानंतर संबंधित ग्राहकाचा जोडलेला वीजभार 674.76 किलोवॉट आढळला.

तपासणी दरम्यान हकीमुद्दीन कुतुबुद्दीन उनवाला या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे रिमोट कंट्रोल आढळून आला. या रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कारखान्याच्या वीजवापरात 90 टक्के घट होत असल्याचे पंचासमक्ष केलेल्या प्रात्यक्षिकात आढळून आले. तर रिमोट कंट्रोलचे सर्किट एका पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक स्विच बोर्डमध्ये निळ्या, काळ्या व लाल टेपमध्ये लपवलेले निदर्शनास आले. मीटरच्या बाहेरील बाजूस रिमोट कंट्रोल सर्किट बसवून व फ़ेरफ़ार करुन वीज वापरणे ही वीजचोरी ठरते याबाबत कल्पना दिल्यानंतर वीज वापरकर्त्यांनी वीजचोरी केल्याचे मान्य केले.

हेही वाचा: रुग्णाचे नातेवाईक आणि वॉर्ड बॉय यांच्यात वाद; कारवाई करण्याचे KDMC चे आदेश

जूलै 2017 पासून या कारखान्याने 6 कोटी 17 लाख 71 हजार 330 रुपये किंमतीची 33 लाख 6 हजार 495 युनिट विजेची चोरी केल्याबाबत वाशी भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक सुर्यकांत पानतावणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार वसई पोलीस ठाण्यात वीज कायदा 2003 च्या कलम 135, 138 व 150 नुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कारखाना वलीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने वसई पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी वलीव पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे. स्वयंचलित प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांच्या वीज वापराचे सातत्याने विश्लेषण व या विश्लेषणानुसार आढळणाऱ्या त्रुटींवर महावितरण तीक्ष्ण लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कोणतीही युक्ती वापरून वीजचोरीचा गुन्हा करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक कमांडर (नि) शिवाजी इंदलकर, उपसंचालक सुमित कुमार, मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपसंचालक सतीश कापडणी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे, सहायक अभियंता कपिल गाठले, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी सुबोध घाणेकर, मुख्य तंत्रज्ञ शाम शिंबे, वरिष्ठ तंत्रज्ञ विजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

loading image
go to top