कोरोनाशी लढण्यासाठी वसई-विरार महापालिका सज्ज; नवनिर्वाचित आयुक्त गंगाधरन डी. यांची ग्वाही 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020

कोरोनासारख्या महामारीचा प्रकोप सर्वत्र वाढत चालला आहे. रुग्णसंख्या आटोक्‍यात आणण्याचे मोठे आव्हान सर्वच महापालिका प्रशासनासमोर आहे. ऐन कोरोनाच्या संकटकाळातच वसई-विरार महापालिकेचे आयुक्त म्हणून गंगाधरन डी. यांची सूत्रे स्वीकारली.

वसई  : कोरोनासारख्या महामारीचा प्रकोप सर्वत्र वाढत चालला आहे. रुग्णसंख्या आटोक्‍यात आणण्याचे मोठे आव्हान सर्वच महापालिका प्रशासनासमोर आहे. ऐन कोरोनाच्या संकटकाळातच वसई-विरार महापालिकेचे आयुक्त म्हणून गंगाधरन डी. यांची सूत्रे स्वीकारली. शहरविकासाबरोबरच इतरही अनेक प्रश्‍न मार्गी लावताना कोरोनाशी यशस्वी लढा देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. महापालिका त्यासाठी सज्ज आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. "सकाळ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. 

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पु्न्हा उफाळून येणार! वाचा काय आहे प्रकरण...

एक आयुक्त म्हणून शहर कोरोनामुक्त करण्यास आमचे प्राधान्य आहे. सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या 400 हून अधिक आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही 200 पेक्षा जास्त आहे. विरार म्हाडा बिल्डिंग क्रमांक 14 मध्ये आयसोलेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. 370 जणांची त्याची क्षमता आहे. ज्येष्ठ नागरिकांना अग्रवाल केंद्रात ठेवण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पालिका स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. घरोघरी माहितीपुस्तिकांचे वाटप करत आहोत. जनजागृती मोहीम सुरू आहे. आरोग्य खात्याकडून गृहसंकुलात सर्व्हे केला जात आहे. प्रत्येक सोसायटीत हॅण्डवॉश केंद्र उभारण्यात आले आहे. ते सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती गंगाधरन यांनी दिली. 

संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची स्वॅब तपासणी लगेच केली जात नाही. कारण लक्षणे त्वरित दिसत नाहीत. त्यामुळे पाच दिवसांनंतर तपासणी करून अहवाल मागवला जातो. रुग्णालयात दाखल असलेल्यांची जेवणाची-पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. त्यांच्या सोयी-सुविधांवर भर आहे. त्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात येते. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांच्या संपर्कातही आरोग्य विभाग असतो, असे गंगाधरन म्हणाले. 

वसई गावातील जी. जी. महाविद्यालयात सध्या 750 खाटा असलेली व्यवस्था करण्यात आली आहे. महाविद्यालयाची इमारत तळमजला अधिक एक अशी आहे. वसई पूर्वेकडील वरुण इंडस्ट्रीदेखील ताब्यात घेण्यात आली असून त्याठिकाणी अतिजोखमीचे रुग्ण ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. एक हजार रुग्ण राहू शकतात, अशी सोय सध्या तरी आहे. विजेचे काम पूर्ण झाल्यावर त्वरित त्याचा वापर करण्यात येईल. 

 

अभियंत्याच्या उपस्थितीत नालेसफाई 
पालिका हद्दीतील नाले व गटारांची पाहणी करण्यात आली आहे. नालेसफाई सुरू आहे. गटारातील गाळही काढला जात आहे. नालेसफाईच्या ठिकाणी कनिष्ठ अभियंत्याला जातीने उपस्थित राहून कामाची पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, असेही आयुक्त म्हणाले. 

...म्हणून विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन नाही; उड्डानमंत्र्यांचा अजब निर्णय

लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करणार 
पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करत नाही, अशीही एक चर्चा रंगली आहे. त्याबाबत स्पष्टीकरण देताना आयुक्त म्हणाले, की मी नव्यानेच पालिकेत रुजू झाल्याने अद्याप स्थानिक लोकप्रतिनिधींच्या फारशा संपर्कात आलेलो नाही. मात्र, कोरोनावर मात करण्याबाबतच्या त्यांच्या सूचनांचा आदरच केला जाईल. त्यांच्याशी चर्चा करायला मी कधीही उपलब्ध आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नक्कीच एकत्र काम करू. 

आरोग्य दूतांच्या सुरक्षेची खबरदारी 
आरोग्य दूतांच्या सुरक्षेची काळजी पालिकेतर्फे घेण्यात येत आहे. आयसोलेशन केंद्रात काम करणारे आरोग्य अधिकारी-कर्मचारी, डॉक्‍टर आदींना अद्ययावत असे पीपीई किट पुरविण्यात येत आहेत. घरापासून बाहेर थांबणाऱ्यांसाठी म्हाडा परिसरात राहण्याची व्यवस्था केली आहे. तिथे 200 जणांची राहण्याची क्षमता आहे. सध्या 70 जणांचे तिथे वास्तव्य आहे, असे गंगाधरन म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasai-Virar Municipal Corporation ready to fight Corona says Newly elected Commissioner Gangadharan d.