मुंबईतील या गावात 'विकास' काही दिसलाच नाही... ना रस्त्याची सुविधा, ना वीज...जगापासूनही संपर्क तुटलेला 

निसार अली
Wednesday, 9 September 2020

  • मुंबईतील या गावात 'विकास' काही दिसलाच नाही... ना रस्त्याची सुविधा, ना वीज...जगापासूनही संपर्क तुटलेला 
  • 'विकास' न पाहिलेले मुंबईतील गाव
  • मुलभूत सुविधांपासून वंचित; जगापासूनही संपर्क तुटलेला

मालाड : स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे उलटली तरी, मालाड पश्चिमेत मढ बेटावर दिडशे वर्षांपुर्वी वसलेले 'धारावली' गाव अजूनही संपर्क साधनांअभावी जगापासून तुटलेले आहे. मुंबईच्या कुशीत वसलेल्या हजार आदिवासी लोकवस्तीचे हे विदारक वास्तव.  पक्का रस्ता, बस अशी कोणतीही वाहतुकीची साधने नाहीत. वीज, शिक्षण आणि पाण्यासारख्या मुलभूत हक्कांपासूनही हे गावकरी अद्याप वंचित आहेत. त्यामुळे एकीकडे स्मार्ट सिटी, मुंबईच्या विकासाबाबत चर्चा होत असल्या तरी आमच्या गावातील पिढ्यांनी अद्याप 'विकास' पाहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया हे गावकरी व्यक्त करतात. 

बेकायदा बांधकामप्रकरणी कंगनाला BMC नोटीस; चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा

मढ मार्वे रोड ते धारावली गावापर्यंत साधारणपणे 2 किलोमीटरचे अंतर आहे. मात्र, यासाठी असलेला रस्त्याची पुर्णत: दुर्दशा झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा तसेच बाहेरील जगाचाही गावकऱ्यांशी संपर्क होत नाही. काही वर्षांपूर्वीं या रस्त्यावर प्रशासनाने सौर दिवे लावले होते.  मात्र, काहि दिवसांतच दिवे व खांब चोरीला गेले. रुग्णवाहिकाही गावापर्यंत चांगला रस्ता नसल्याने येत नाही. त्यामुळे गर्भवती व गंभीर रुग्णांनाही अत्यावश्यक स्थितीत गावाबाहेर येता येत नाही. 
कोणाचेच लक्ष नसल्याने या ठिकाणी असलेल्या मँग्रोवनचीही सर्रास कत्तल होत आहे. तसेच, येथे असलेल्या सरकारी जमिनीवर अनधिकृत झोपड्या बांधण्याचे व विकण्याचा धंदाही खुलेआम चालू आहे. येथील पौराणिक महत्त्व असलेल्या तलावाची नोंद शासनदरबारी आहे. मात्र, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी व भंगार व्यावसायिकांनी तलावात डेब्रिजचा भरणा करून जवळपास अर्धा तलाव काबीज केला आहे. 

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर; आयुक्तांना दिले निवेदन

सुर्य मावळल्यानंतर गावही गुडूप
गावातून बाहेर ये-जा करण्यासाठी बेस्ट बस नाही. त्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करत मढ मार्वे रोडपर्यंत येणे भाग पडते. शाळा नसल्याने विध्यार्थ्यांना दोन किलोमीटर चालत चालत मढ मार्वे रस्त्यावर येऊन बेस्टची बस पकडून मालवणी गाव किंवा आकसा गाव येथे जावे लागते.  पिण्याचे पाणीही गावकऱ्यांना बाहेरून जवळपास अर्धा किलोमीटर लांबून आणावे लागते. रस्त्यावर पथ दिवे नसल्याने व रस्ता खड्डेम्य झाल्याने सूर्य मावळल्यानंतर या गावाचा संपर्क थांबतो.

झगमगटातील काळोख
मढ बेट हे नावाजलेले पर्यटन स्थळ आहे. येथे दोन पंचतारांकित हॉटेल आहे. मार्वे, आकसा, दाणा पाणी, सिल्वर बीच, मढ बीच असे पाच जगप्रसिद्ध समुद्र किनारे येथे आहेत. तसेच, मढ बेटावर हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रिकरणासाठी अनेक स्टुडिओ आणि बंगले आहेत. शिवाय मढ येथे वायू सेना आणि थल सेनेचे केंद्रही आहेत. ऐवढे महत्वाचे मढ बेट असूनही याच बेटावरील धारावली गाव मात्र, मूलभूत सुविधांपासून वंचित व दुर्लक्षित आहे. विशेष म्हणजे मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख हे गाव असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमच्या चार पिढ्या येथे संपल्या. मात्र, विकास कुठे दिसला नाही. जणू आम्ही मुंबई नव्हे तर, दूर कोणत्यातरी खेड्या-पाड्यात राहतो असे वाटते. एकीकडे जगव वेगाने पुढे जात आहे आणि आमच्या गावाला त्याही काही गंधही नाही. याबाबत अनेकवेळा आमदार, खासदार, तसेच पालिकेकडे तक्रारी आणि निवेदन दिले. मात्र, अजून काहीच झालेले नाही. ं
- जयश्री धारोलिकर,
गावकरी

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In this village in Mumbai, there is no development ... no road facilities, no electricity ... communication is cut off from the world