...अन् स्वातंत्र्यदिनी पाटोळ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण थांबली; जलजीवन मिशनद्वारे थेट नळजोडणी

राहुल क्षीरसागर
Sunday, 16 August 2020

या योजनेच्या माध्यमातून पाईप लाईनद्वारे गावात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पाण्याच्या टाकीतून गावापाड्यावरील प्रत्येक रहिवाशाच्या घरात व दारात बसविण्यात येणाऱ्या नळाद्वारे त्यांना पाणी मिळणार आहे.

ठाणे : ठाणे हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ठाण्यासह मुंबईकरांची तहान भागवणारे अनेक धरणे जिल्ह्यात आहेत. ''धरण उशाशी आणि कोरड घशाशी'' या म्हणीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून धरणांच्या आजूबाजूला असलेल्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यातील महिलांना डोक्यावर हांडे घेवून पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. अखेर ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने भातसा धरणावर तरंगत्या पंपाद्वारे पाणी उचलून गावकऱ्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोवले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाटोळ गावापाड्यावरील नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबली आहे.

सावधान! कोरोनानंतर मुंबईवर आणखी एक संकट घोंघावतय

ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यात बहुतांश भाग हा आदिवासीबहुल भाग आहे. या परिसरात उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. गावाची तहान भागवण्यासाठी भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास करून आणि स्थानिकांशीचर्चा करून नैसर्गिक झऱ्यांचे रूपांतर जलकुंभात करणे, वनराई बंधारे बांधणे, जलकुंभ, बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलावांची दुरुस्ती, गावतलावांची दुरुस्ती आदी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात शहापूर तालुक्यातील पाटोळ गाव व पाटोळ पाड्यावरील नागरिकांची शेकडो वर्षापासून पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत (राष्ट्रीय पेयजल योजना) योजनेतून भातसा धरणावर सोलर सिस्टम बसवून तरंगते पापाद्वारे पाणी उचाण्याची योजना राबविण्यात आली. 

पालघर जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली, धामणी धरण तुडूंब

या योजनेच्या माध्यमातून पाईप लाईनद्वारे गावात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पाण्याच्या टाकीतून वितरण वाहिन्याच्या माध्यमातून गावापाड्यावरील प्रत्येक रहिवाशाच्या घरात व दारात बसविण्यात येणाऱ्या नळाद्वारे त्यांना पाणी मिळणार आहे. त्यानुसार शनिवारी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरु झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातवरण पसरले आहे.

निसर्ग नंतर मासेमारीला पुन्हा वादळाचा तडाखा; नव्या हंगामाचा मुहुर्त लांबला; अद्याप मासेमारी नौका बंदरातच

अनेक वर्षांपासून गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. त्यात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे गावकऱ्यांना थेट घरात पाणी मिळणार आहे. या योजनेमुळे 800 ते एक हजार लोकसंख्या असलेल्या या गावपाड्यावरील 160 कुटुंबांची पाणी टंचाईतून मुक्तता झाली आहे.
- एच.एल. भस्मे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जि.प. ठाणे.
 

---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: villagers of patol village gets tap water connection on the eve of i-day