अखेर "वाडिया'तील सेवा पूर्ववत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

वाडिया रुग्णालयाचा थकीत निधी पालिका आणि राज्य सरकारकडून तातडीने दिला जाणार असल्याने रुग्णालयातील रुग्णसेवा पूर्ववत सुरू झाली आहे. आज दिवसभरात 800 नव्या रुग्णांची नोंद झाली.

मुंबई : वाडिया रुग्णालयाचा थकीत निधी पालिका आणि राज्य सरकारकडून तातडीने दिला जाणार असल्याने रुग्णालयातील रुग्णसेवा पूर्ववत सुरू झाली आहे. आज दिवसभरात 800 नव्या रुग्णांची नोंद झाली. करार, निधी आणि त्या संदर्भातील निर्माण झालेला गुंता सोडवण्यासाठी समिती नियुक्ती केली आहे. या समितीत महापालिका आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव आणि वाडिया ट्रस्ट यांची संयुक्त समिती नियुक्ती केली आहे. ही समिती 15 दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली. 

महत्वाची बातमी ः लोकलमधील स्टंटबाजांचे प्रमाण घटले

निधीअभावी वाडिया रुग्णालय बंद करण्याचा निर्णय वाडिया ट्रस्टने घेतला होता. याचे पडसाद सर्व स्तरावर उमटले. ब्रिटिश काळापासून सुरू असलेले रुग्णालय बंद पडू नये म्हणून आंदोलने सुरू झाली. या आंदोलनात राजकीय पक्षांनीही उडी घेतली. निधी नसल्याने रुग्णालयातील औषधांचा साठाही संपला होता. त्यामुळे नवे रुग्ण दाखल न करण्याचा आणि जुन्या रुग्णांना घरी पाठवून रुग्णालयच बंद करण्याचा निर्णय वाडिया ट्रस्टने घेतला होता. ही प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याने याचे तीव्र पडसाद उमटले. महापालिका आणि राज्य सरकारने दखल घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पालिका आणि रुग्णालय प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन पालिका आणि राज्य सरकारचा रखडलेला एकूण 46 कोटी रुपये तात्काळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आजपासून वाडिया रुग्णालय पूर्ववत सुरू झाले. नवरोजी वाडिया प्रसूती रुग्णालय बाह्य रुग्ण विभागात 264 आणि बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात 515 रुग्णांची नोंद झाली. 

महत्वाची बातमी ः मुंबईकरांनो 'त्या' आनंदी दिवसांसाठी सज्ज व्हा

थकीत निधी मिळाला तरी करारानुसार न होणारी कामे, रुग्णालय प्रशासनामधील अनियमिततेमुळे रखडणारा निधी आदी मुद्दे कायम आहेत. त्यामुळे निधी आणि पर्यायाने रुग्णसेवेवर यापुढे परिणाम होऊ नये यासाठी हा प्रश्‍न सोडवण्यासाठी समिती नियुक्ती करण्यात आली आहे. 15 दिवसांत समिती अहवाल सादर करणार आहे. जुन्या करारात आवश्‍यकता असल्यास बदलही केले जाणार आहेत, असेही आयुक्त परदेशी म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत थकीत रक्कम देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही रुग्णालयातील सुविधा सुरू केल्या आहेत. सुविधा बंद झाल्यानंतर नवीन रुग्ण दाखल करून घेणे बंद करण्यात आले होते. आता रुग्णसेवा पूर्ववत झाली आहे. मात्र महापालिका आणि राज्य सरकार यांच्याकडे बाकी राहिलेला थकीत निधीची रक्कम किती टप्प्यात मिळेल, हे आम्हाला सांगितलेले नाही. 46 कोटींमध्ये किती दिवस सेवा देता येईल, तेवढी आम्ही देऊ. 
- मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडिया ट्रस्ट. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wadia hospital service restarts again