वाफेघर ग्रामस्थांच्या एकीमुळे गाव उजळले; जनसहभागातून महावितरणच्या कामाला वेग...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा जिल्ह्यासह सुधागड तालुक्याला देखील बसला आहे. यात महावितरणचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मात्र; सुधागड तालुक्यातील वाफेघर गावात ग्रामस्थांच्या एकीमुळे गाव उजळला आहे.

पाली (वार्ताहर) : निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा जिल्ह्यासह सुधागड तालुक्याला देखील बसला आहे. यात महावितरणचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मात्र; सुधागड तालुक्यातील वाफेघर गावात ग्रामस्थांच्या एकीमुळे गाव उजळला आहे. जनसहभागातून महावितरणच्या कामाला वेग आल्याने गावातील वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे.

वाचा ः लॉकडाऊनमध्ये एसटीने शोधला उत्पन्नाना नवा मार्ग; 21 लाखांचे मिळाले उत्पन्न

सुधागड तालुक्यातील कित्येक गावात अजूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. यासाठी तालुक्यातील यंत्रणेने कंबर कसली असून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी वीज महावितरणला अनेक कामांत स्थानिक ग्रामस्थांची मदत मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून तहसीलदार रायन्नावर, महावितरणचे जतीन पाटील यांनी संयुक्तपणे तालुक्यातील सर्व सरपंचांची बैठक बोलावली. तालुक्यातील महावितरणची परिस्थिती त्याच्यासमोर ठेवली. महावितरणचे कर्मचारी तसेच गावातील काही तरुणाच्या सहभागातून विजेचे कोसळलेले खांब तसेच वायर खेचण्याचे काम केल्यास येत्या काही दिवसांत संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकेल, अन्यथा पूर्ण महिना गेला तरी वीज येण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. 

वाचा ः स्थलांतरीत कामगारांचे मुंबईत परतण्यासाठी मालकांना साकडे; वाचा बातमी

या पार्श्वभूमीवर पाली शहरासह तालुक्यातील नाडसूर, नागशेत, गोमाशी, मढाळी, वाघोशी, वाफेघर, विडसई, भेरव, कुंभारशेत, कुंभारघर यासारख्या बहुतेक सर्वच गावात लोकसहभागातून महावितरणचे काम सुरु झाले आहे. यापैकी अनेक गावात वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. तालुक्यातील अनेक गावे गावकी घेवून झाडे तोडणे, उपकरणे बसविण्यास सहाय्य करणे, खड्डे मारण्यापासून ते विजेचे खांब उभे करणे, विजेच्या वायर खेचण्यापर्यंत काम केल्यामुळे सुधागड तालुक्यातील सर्व गावातील वीजपुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे. ग्रामस्थ, तालुक्यातील कंत्राटदार संजय म्हात्रे, वसई आणि नाशिक येथील महावितरणच्या पथकाच्या सहाय्याने दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. 

वाचा ः कोरोनाची लागण झाल्यांनतर धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात...

निसर्ग चक्रीवादळामुळे गावातील 13 हायटेन्शनचे विजेचे खांब कोसळले होते. त्यामुळे गाव 8 दिवस अंधारात होता. मात्र गावकीने ठरवल्यानुसार प्रत्येक घरटी, एक माणूस कामावर येवून आमचे ग्रामस्थ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मदत करत आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. 
- राजेश बेलोसे, ग्रामस्थ, वाफेघर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wafeghar villagers helps mahavitarn to restart electricity as soon as possible