esakal | नालासोपाऱ्यात फेरीवाल्यांचा महापालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला

बोलून बातमी शोधा

नालासोपारा
नालासोपाऱ्यात फेरीवाल्यांचा महापालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला
sakal_logo
By
दीनानाथ परब

नालासोपारा: रस्त्यावर व्यवसाय करण्यापासून रोखलं म्हणून महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरला आणि तीन कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांच्या जमावाने मारहाण केली. नालासोपारा पूर्वेला सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. अधिकारी या मारहाणीत जखमी झाला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. वसई-विरार महापालिका हद्दीतील सर्व दुकाने, आस्थापने आणि बाजारपेठांना सकाळी सात ते अकरा अशी चार तासांच व्यवसाय करण्याची परवानगी आहे.

मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास बी वॉर्डचे अधिकारी मधुकर डोंगरे (४६) हे अन्य तीन कर्मचाऱ्यांसोबत नालासोपारा पूर्वेला रेहमत नगरमध्ये गेले होते. त्यावेळी हातगाडीवरुन खाद्यपदार्थांची सर्रास विक्री सुरु होती. फेरीवाल्यांनी सर्व रस्ता भरलेला होता. कोविड नियमांचे उल्लंघन सुरु होते. मधुकर डोंगरे त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांसह गाडीतून उतरले व व्यवसाय बंद करा असे फेरीवाल्यांना म्हणाले.

हेही वाचा: मुंबईत मोफत मिळणार ऑक्सिजन, कसं ते समजून घ्या...

डोंगरे यांनी हे सांगताच फेरीवाल्यांचा संताप अनावर झाला. फेरीवाले हिंसक बनले. त्यांनी डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण सुरु केली. मंगळवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. जवळपास १०० जणांचा जमाव जमल्यानंतर सहकाऱ्यांनी कशीबशी डोंगरेंची सुटका केली व त्यांना गाडीत बसवले. तुळींज पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी जमाव आक्रमक झालेला होता. त्यांनी अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले. त्यानंतर फेरीवाल्यांनी आपल्या हातगाड्या तिथेच सोडल्या व पळून गेले.

हेही वाचा: "सेनापती कधीही युद्धभूमीवर जाऊन बसत नाही"

या हातगाड्यांवर भाज्या, फळे आणि अन्य वस्तु होत्या. महापालिकेने या सर्व गाड्या जप्त केल्या. डोंगरे आणि त्यांच्या एका सहकाऱ्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. आयपीसीच्या कलम ३५३ आणि ३३२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रेहमत नगरमध्ये सकाळी सात ते ११ अशी चार तास दुकाने उघडी होती. संपूर्ण दिवस फेरीवाले तिथे फिरकले नाहीत. मोठ्या प्रमाणात या भागात पोलीस बंदोबस्त तैनात होता. वसई-विरार भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. मंगळवारी ६८३ कोरोना रुग्णांची नोंद झाली.