घणसोलीतील पाणथळीवर भरावास मनाई

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

पर्यावरणप्रेमींकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींची दखल कांदळवन संरक्षण आणि संवर्धन समितीकडून घेण्यात आली आहे. या समितीने घणसोली येथील भरती क्षेत्राजवळील पाणथळ भागात सुरू असलेला भराव ताबडतोब थांबवण्याचे आदेश सिडको प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. 

नवी मुंबई : पर्यावरणप्रेमींकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींची दखल कांदळवन संरक्षण आणि संवर्धन समितीकडून घेण्यात आली आहे. या समितीने घणसोली येथील भरती क्षेत्राजवळील पाणथळ भागात सुरू असलेला भराव ताबडतोब थांबवण्याचे आदेश सिडको प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. 

ही बातमी वाचली का? पालकांना दिलासा! अंगणवाडीत बालकांवर आता प्रथमोपचार 

घणसोली येथील सेक्‍टर 12 मधील पाणथळ भागात मोठ्या प्रमाणावर भराव करण्यात येत आहे. अशा आशयाच्या तक्रारी काही पर्यावरणप्रेमी संस्था आणि स्थानिकांनी कांदळवन संरक्षण व संवर्धन समितीकडे केल्या होत्या. याबाबत समितीचे सदस्य डी. स्टॅलिन यांनी सांगितले की, सिडकोने येथील भरती क्षेत्राजवळील पाणथळ भागात भराव वा कुठल्याही प्रकारचे विकासकाम केले जाणार नाही, याची खात्री द्यायला हवी. सिडकोने येथील राज्य सरकारच्या आंतरराष्ट्रीय स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍सकरिता राखीव असलेल्या भूखंडांपैकी 10 हजार चौरस मीटरचा भूखंड खासगी विकसकाला दिला आहे. या भूखंडाची सीमा वन विभागाच्या हद्दीत येते. सिडकोच्या विकास आराखड्यानुसार हा भाग सीआरझेड 2 मध्ये येतो. त्यामुळे अतिरिक्त एफएसआय देत विकासक येथे व्यावसायिक, रहिवासी प्रकल्प आणण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

ही बातमी वाचली का? तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात गुन्हा

याविषयी नेचर कनेक्‍ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले, आमचा विकासाला विरोध नाही; पण तो पर्यावरणाच्या मुळावर उठणारा असेल, तर त्याबाबत नक्कीच विरोध करू. हा भाग ठाणे खाडीला लागून असल्याने भरतीचे पाणी येथील पाणथळीमार्फत थोपवले जाते. या परिसरात कोणताही प्रकल्प आणताना पाणथळ नष्ट झाल्याने कल्याण, बदलापूरमध्ये निर्माण झालेली पुरसदृश स्थितीचे उदाहरण सिडको प्रशासनाने डोळ्यासमोर आणावे. 

ही बातमी वाचली का? ऐन लग्न सराईत फुले स्वस्त

श्री एकविरा आई प्रतिष्ठाचे नंदकुमार पवार म्हणाले की, सिडकोचा विकास करण्याची प्रक्रिया सर्वत्र सारखीच असल्याचे दिसते. एखाद्या विकासकाला मध्यस्थी घ्यायचे आणि तेथील पर्यावरणाचा समूळ नाश करून टाकायचा. उरण आणि नवी मुंबईत सुरू, तसेच प्रस्तावित असलेले सिडकोचे विकास प्रकल्प त्याचे चांगले उदाहरण ठरू शकेल. दरम्यान, कांदळवन संरक्षण व संवर्धन समितीच्या आदेशानंतरही येथे भराव करण्याचे काम बिनबोभाट सुरू आहे. 

याविषयी प्रथम ठाणे येथील सामाजिक वनीकरण विभागाकडे तक्रार केली होती; मात्र त्यांनी वन संरक्षकांकडे तक्रार करण्यास सांगितले. भविष्यात येथे उभ्या राहणाऱ्या निवासी प्रकल्पामुळे येथील कांदळवन, जैवविविधतेची अपरिमित हानी होऊ शकते. 
- झेड. एस. डॅनियल, पर्यावरणप्रेमी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water place ghansoli not permitted to be filled debrij