एक्सपायरी डेट संपलेल्या मालाचं करायचं काय? व्यापारांसमोर मोठं संकट

market
market

महाड : लाँकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या व्यापाऱ्यांपुढे आता मुदतपूर्ण झालेले अथवा होणाऱ्या सामानाचे काय करायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुकानातील विक्री घटत असताना मुदतपूर्ण तारखा ओलांडलेल्या (expiry date) उत्पादनाच्या समस्येमुळे जिल्ह्यातील व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत.

कोरोना पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये मार्चच्या सुरुवातीपासून मंदीचे वातावरण होते. त्यातच लाँकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी खूपच कमी झाली. सरकारने संचारबंदी लागू केल्याने व त्यातच नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन केल्याने बाजारपेठा पूर्णपणे ओस पडल्या. याचा परिणाम दुकानातील मालाची, विविध उत्पादनाची विक्री मंदावण्यावर झाला. बहुसंख्य उत्पादनाची विक्री कमालीची घटली आहे. दुकानांमध्ये पॅकबंद असणाऱ्या सर्व मालावर मुदतीची तारीख असते. या तारखेच्या पूर्वी या उत्पादनाचा वापर करणे अनिवार्य असते. गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहक जागरूक झाल्याने प्रत्येक ग्राहक उत्पादनाची तारीख व मुदतपूर्ण तारीख पडताळूनच सामान खरेदी करत असतो. लाँकडाऊनमुळे दुकानातील बहुसंख्य उत्पादनाच्या मुदतपूर्ण तारखा संपलेल्या आहेत, तर काही संपण्याच्या स्थितीत आहेत.

दुकानांमध्ये मिळणारे वेफर्स, चिप्सपासून मसाले, टोमॅटो केचप, लोणची, चटणी, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, खाद्यतेल, रोजच्या वापरात लागणारे पॅकबंद सामान अशा सर्व उत्पादनावर ही तारीख असते. रायगड जिल्ह्यातील काही दुकानदारांकडे एक्सपायरी डेट उलटून गेलेला माल दुकानात अडकून पडलेला आहे. अनेक दुकाने बंद असल्याने या सामानाची विक्री करता येत नाही तर जी दुकाने उघडी आहेत त्यांच्याकडे ग्राहकांची क्षमता कमी असल्याने सामान पडून आहे. यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान व्यापाऱ्यांचे होणार आहे. सर्वच कंपन्यांकडून अशा प्रकारचे उत्पादन परत घेतले जात नसल्याने तसेच एक्सपायरी डेट उलटलेला माल विकल्यास गुन्हा ठरत असल्याने व्यापारी मात्र चांगलाच कचाट्यात सापडला आहे. त्यातच शॉपिंग सेंटर, माँल, जनरल स्टोअर्स, पानाची व छोटी दुकाने बंद असल्याने याचा सर्वात मोठा फटका या दुकानदारांना बसला आहे. बाजारात येणारा ग्राहक हा झटपट सामान खरेदी करून निघत असल्याने तो आवश्यक तेवढेच सामान घेऊन जात आहे. त्यामुळे इतर माल दुकानात विक्रीविना पडून राहिलेला आहे. त्यामुळे बाजारामध्ये व्यापारी चारी बाजूने आर्थिक नुकसानीत सापडले आहेत. मुदतपूर्ण झालेल्या मालाची मोठी डोकेदुखी व संकट व्यापा-यांपुढे उभे आहे.

लाँकडाऊनमुळे व्यवसाय कसातरी सुरू आहे. मंदीमुळे विक्रीवरही परिणाम होत आहे. जी दुकाने सुरू आहेत त्यांना फारशी अडचण नसली तरी बंद दुकानांपुढे हा प्रश्न नक्कीच आहे.
- अतुल तांबे, विक्रेता

What to do with expiry date? crisis in business

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com