esakal | WHO करणार भारतातील तब्बल १५०० कोरोनाबाधितांवर औषधांचं ट्रायल, 'ही' आहेत औषधं
sakal

बोलून बातमी शोधा

WHO करणार भारतातील तब्बल १५०० कोरोनाबाधितांवर औषधांचं ट्रायल, 'ही' आहेत औषधं

जागतिक आरोग्य संघटनानं (WHO) काही औषधांचे ट्रायल (तपासणी) करण्यास सुरुवात केल्याचं समजतंय. या ट्रायलमधून ही औषधं उपयोगी आहेत का, हे सिद्ध केलं जाईल. 

WHO करणार भारतातील तब्बल १५०० कोरोनाबाधितांवर औषधांचं ट्रायल, 'ही' आहेत औषधं

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसनं लाखो लोकांचा जीव घेतला आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशाला कोरोनावर मात करण्यात यश आलं नाही. कोणत्याही देशानं कोरोनावर लस किंवा ठोस उपाय त्यावरील औषध शोधलं नाही आहे. या कोरोनावर मात करण्यासाठी जवळपास 100 हून अधिक देश याची लस शोधण्यासाठी मेहनत करताहेत. या संसर्गवर औषध शोधण्यासाठी देशादेशात युद्धपातळीवर काम सुरु आहे. अजूनही कोणालाही या कार्यात यश आलेलं नाही. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनानं (WHO) काही औषधांचे ट्रायल (तपासणी) करण्यास सुरुवात केल्याचं समजतंय. या ट्रायलमधून ही औषधं उपयोगी आहेत का, हे सिद्ध केलं जाईल. 

इंग्रजी वृत्तपत्र हिंदूस्थान टाइम्सनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. WHOच्या या ट्रायलमध्ये 1500 भारतीय कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच या ट्रायलमध्ये जगभरातल्या जवळपास 100 देशांच्या रुग्णांचा समावेश असेल. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)या ट्रायलसाठी रुग्णांची निवड करत असून निवडीची प्रक्रिया देखील सुरु केली आहे. यात आतापर्यंत देशातील 9 रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारतासाठी ही एक चांगली बातमी आली आहे.

मोठी बातमी - कोरोना विरुद्धची लढाई लवकरच संपणार, मात्र 'अशी' येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट

कोणकोणत्या औषधांचं होणार ट्रायल 

या ट्रायलदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांना अँटी-व्हायरल औषधं दिली जाणार आहे. यात रेमेडीसवीर, क्लोरोक्विन / हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, लोपीनावीर-रीटोनाविर या औषधांचा समावेश असेल. तर चाचणी दरम्यान, यापैकी कोणत्याही औषधाचा कोरोनाच्या रूग्णावर परिणाम होतो आहे का की नाही याची तपासणी करण्यात येईल. 

या रुग्णालयांची निवड 

आतापर्यंत ज्या रुग्णालयातील रूग्णांची निवड झाली आहे त्यात जोधपूरमधील एम्स, चेन्नईतील अपोलो हॉस्पिटल, अहमदाबाद बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल आणि भोपाळातील चिरायू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांचा समावेश आहे. 

ICMR-नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (NARI) डॉक्टर शीला गोडबोले यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोडबोले यांनी म्हटलं की, सध्या आम्ही आकडेवारीचे पालन करत असल्यानं ज्या ठिकाणी रुग्ण जास्त आहेत, तेथे चाचणी साइट्स असणार आहेत. यापूर्वी 9 रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरच आणखी 4 रुग्णालयांना ग्रीन सिग्नल देण्यात येईल. यामध्ये रुग्णांच्या संख्येवर कोणतेही बंधन नसेल. आम्ही या प्रोग्राममध्ये आणखी रूग्णांचा समावेश करू शकतो.

मुंबईकरांनो पुढच्या महिन्यापासून 'या' युद्धासाठीही तयार राहा, 'हे' आहेत हॉटस्पॉस्ट...

या तीन भारतीय कंपन्यांनी तयार केली कोरोनाची लस 

भारतातील 3 कंपन्यांनी कोरोनाची लस तयार केली असल्याचंही समजतंय. या तिन्ही भारतीय कंपन्यांना या लसीच्या क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी मिळाली आहे. या तिन्ही कंपन्यांना केंद्र सरकारनं युद्धपातळीवर कोरोनावरील लस तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

ग्लेनमार्क, केडिला हेल्थकेयर आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या तीन भारतीय कंपन्यांनी व्हायरससाठीची तयार केली आहे. या तिन्ही कंपन्यांना लशी कोरोनाविरुद्ध प्रभावी असल्याचं सुरुवातीच्या संशोधनात दिसून आलं. भारतातल्या रुग्णालयामध्ये या लशी रुग्णांना देऊन बघाव्यात, असं कंपन्यांना सांगण्यात आलं आहे. यासंबंधित एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, सुरक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या औषधाला लस बनवण्याचं काम दिलं जाईल.

WHO to conduct tests of various medicines on one thousand five hundred covid patients