चक्रीवादळांना सामोरे जाण्यासाठी निवारा केंद्रे उभारणार? राज्य सरकारचा केंद्राकडे 8 कोटींचा प्रस्ताव

चक्रीवादळांना सामोरे जाण्यासाठी निवारा केंद्रे उभारणार? राज्य सरकारचा केंद्राकडे 8 कोटींचा प्रस्ताव

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळासारख्या संकटाला सामोरे जाण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीलगतच्या तालुक्‍यांमध्ये चक्री वादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, उरण व श्रीवर्धन या चार तालुक्‍यांच्या ठिकाणी ही केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी दिल्ली येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या केंद्रसाठी 8 कोटी 6 लक्ष 72 हजार रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. 

नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर मनुष्यहानी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीलगतच्या तालुक्‍यांमध्ये चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा प्रकारची आपत्ती निर्माण होऊन मनुष्यहानी होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीलगतच्या उरण तालुक्‍यातील मोठी जुई, श्रीवर्धन तालुक्‍यातील बोर्ली, मुरूड तालुक्‍यातील राजपुरी व अलिबाग तालुक्‍यातील आवास अशा एकूण 4 ठिकाणी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.

गावांमधील सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती करून त्याचे रूपांतर चक्रीवादळ निवारा केंद्रात केले जाणार असून परिस्थितीनुरूप त्याचा वापर केला जाईल. त्यानुसार याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे. याबाबत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनास सविस्तर प्रस्ताव सादर केला. राज्य शासनाकडून प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांना अंतिम मंजुरीकरिता पाठविण्यात आला आहे. लवकरच या 4 ठिकाणी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याबाबत अंमलबजावणी सुरू होईल. या कामासाठी 8 कोटी 6 लक्ष 72 हजार रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संचालकांकडून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प व्यवस्थापकांकडे मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. 

चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली आहे. या केंद्रामुळे भविष्यात कोणताही आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांना व शासनाला त्याचा फायदा होणार आहे. तसेच अशा वेगवेगळ्या संकटाला सहजरित्या हाताळण्यास निवारा केंद्रांचा उपयोग होणार आहे. 
- निधी चौधरी,
जिल्हाधिकारी- रायगड. 

Will shelters be set up to deal with hurricanes State governments proposal of Rs 8 crore to the Center

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com