कोरोनाची भीती न बाळगता अवयवदान करा; अवयवदान प्रत्यारोपण समितीकडून आवाहन

कोरोनाची भीती न बाळगता अवयवदान करा; अवयवदान प्रत्यारोपण समितीकडून आवाहन

मुंबई :  कोरोना काळात नॉन कोव्हिड रुग्णांची जशी ससेहोलपट झाली, तशीच अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांचीही झाली. कारण कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून अगदी हाताच्या बोटांएवढेच अवयवदान झाले आहे. दरम्यान, सध्या कोरोना काळ असूनही मुंबई अवयवदान प्रत्यारोपण समितीकडून विशेष काळजी घेतली जात आहे. अवयदानासाठी समितीकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अवयदात्यांची चाचणी केली जाते. त्यांच्या कुटुंबीयांची देखील कोरोना चाचणी केली जाते. त्याच्या जवळील व्यक्तीने परदेशी वारी केली का? हाय रिस्क घटकांच्या संपर्कात अवयव दाता होता का? याची माहिती घेऊन ती व्यक्ती अवयदानासाठी योग्य की अयोग्य हे समिती ठरवरणार असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ . माथूर यांनी सांगितले.

तसेच अवयव प्रत्यारोपणाचे काम करणाऱ्या हेल्थ केअर कर्मचाऱ्यांची देखील वारंवार तपासणी करण्यात येत आहे. कोणी संशयितही असल्यास त्यांना त्या टीम मधून काढून निगेटिव्ह होई पर्यंत प्रत्यारोपण विभागात काम दिले जात नाही. ज्यामुळे आतापर्यंत समितीत काम करण्यांपैकी एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना काळ आव्हानात्मक असून अशा काळातच अवयवदान करण्यास समोर येऊन दुसऱ्याचे जीवन वाचवा असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

मुंबईत मार्च ते जुलै महिन्यात दहा अवयवदात्यांनी अवयवदान केले. त्यातून एकूण 28 अवयवांचे दान झाले. यात किडनी 14, यकृत 10, हृदय 1 , फुप्फुस 1, स्वादु पिंड 1 तर छोटे आतडे एक असे दान झाले. मागच्या वर्षी 2019 मधील मार्च ते जुलै महिन्यात एकूण अवयव दाते 33 होते. त्यात मूत्रपिंड 59, यकृत 28, हृदय 12, फुप्फुस 6 अशी अवयवदानाची नोंद होती. 


3 हजार रुग्ण किडनीच्या प्रतिक्षेत 
सध्या किडनीच्या प्रतिक्षा यादीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. किडनीसंदर्भातील विकार अनेकदा खूप उशिरा लक्षात येत असल्यामुळे त्याला सायलेंट किलर या आजाराने ही ओळखलं जातं. सध्या मुंबईत जवळपास 3 हजार 536 जणांना किडनीची आवश्यकता आहे. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, त्यापाठोपाठ 350 जण यकृताच्या प्रतिक्षेत आहेत. 27 जण हृदय, 14 जण फुप्फुस, 10 जणांना स्वादुपिंड आणि तिघांना हातांची गरज आहे. 
----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com