एक गाव नेटवर्क विना! सायवनमधील ग्रामस्थ सुविधांपासून दूर, प्रशासकीय कामांचा घोळ

महेंद्र पवार
Friday, 30 October 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावाने शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. मात्र, अगदी डहाणू पासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या सायवन गावात गेल्या दोन वर्षापासून इंटरनेट नेटवर्कची सुविधाच नाही.

कासा ः डहाणू तालुक्‍यातील सायवन परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी अजूनही इंटरनेट नेटवर्कविना जीवन जगत आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. मात्र, अगदी डहाणू पासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या सायवन गावात गेल्या दोन वर्षापासून इंटरनेट नेटवर्कची सुविधाच नाही. या गावात मोबाईलला देखील नेटवर्क नसल्याने फोन देखील लागत नाहीत. 

हेही वाचा - रेल्वे प्रवासात मास्क बंधनकारक; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

जवळपास 15 ते 20 गाव खेड्यातील नागरिक बाजारपेठ म्हणून सायवन परिसरात खरेदीसाठी येत असतात. कासापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कासा-उधवा रस्त्यावर हे गाव असून येथे ग्रामीण आरोग्य रुग्णालय, दोन बॅंका, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, पोलिस ठाणे, वनविभाग कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय असून नेटवर्क नसल्याने प्रशासकीय कामांचा खोळंबा होत आहे. सध्या प्रशासन सरकारच्या अनेक योजना ऑनलाईन पद्धतीने मागवत आहेत. त्यामुळे योजनांचा लाभ घेताना येथील नागरिकांचा गोंधळ उडत आहे. येथील नागरिकांना साधा फोनवर निरोप जरी द्यायचा असले तर त्यांना 5 ते 6 किलोमीटर अंतरावर जाऊन फोनवर संपर्क साधावा लागतो. त्यात हा भाग आदिवासी बहुल असून अनेक वेळा आमदार, खासदार यांच्याकडे याबाबतीत तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्यापही नेटवर्कसाठी टॉवर होऊ शकत नाही. एक जुना टॉवर असून त्यावरून नेटवर्क पोहोचत नाही.  

हेही वाचा - धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला, भाजपची मागणी

कासा -चारोटी या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असून गुजरातची बॉर्डर 12 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. हे रस्ते रहदारीचे असून येथे जंगल व दऱ्या-खोऱ्या असल्याने नेटवर्क पोहोचत नाही. त्यामुळे एखादी घटना घडल्यास मोठा प्रश्न निर्माण होतो. यामुळे येथे नेटवर्कसाठी लवकर टॉवर उभा करावा अशी मागणी होत आहे. 

 

सायवन येथे गेल्या दोन वर्षापासून टॉवर बंद असल्याने इंटरनेट नेटवर्क नाही. सध्या मुलांचे शालेय शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. मात्र, आमच्या येथे साध्या फोनला नेटवर्क नाही, तर शिक्षण दूरच राहिले. गंगोडी, शेणसरी येथे जिओ कंपनीकडून नवीन टॉवर उभारला जात आहे. त्यावरून तरी पुढे नेटवर्क मिळेल आणि आमची फोनची सुविधा सुरू होईल. 
- महेंन्द्र खांडवी,
सदस्य, ग्रामपंचायत सायवन 

 

पूर्वी येथे एका कंपनीचा टॉवर होता. परंतु, तो वनविभागाच्या जागेत असल्याने तो बंद झाला. नवीन टॉवरचे नियोजन झाले असून लवकरच तेथील नेटवर्कचा प्रश्न सुटेल. 
- राहुल सारंग,
तहसीलदार डहाणू 

Without a village network Away from the rural facilities in Siwan

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without a village network Away from the rural facilities in Siwan