लग्न समारंभात हवेत महागडे दागिने! आता चिंता सोडा...

लग्न समारंभात हवेत महागडे दागिने! आता चिंता सोडा...
लग्न समारंभात हवेत महागडे दागिने! आता चिंता सोडा...

नवी मुंबई : सोन्याच्या तुलनेत भाडे तत्त्वावरील दागिने कमी भावात मिळतात. हल्ली सोन्याचा भाव इतका वाढलाय, की तुमच्याजवळ सोने असले तरी ते बॅंक तिजोरीमध्येच ठेवावे लागते. तसेच इतके जड दागिने घालून रोज वावरणे हे फक्‍त दूरचित्रवाणी मालिकांमधील स्त्री पात्रांनाच शोभते आणि जमू शकते. सर्वसामान्य गृहिणींना, नोकरदार महिलांना हे सगळे घालून वावरणे अवघड जाते. शिवाय प्रवासात असे दागिने घालणे हे धोकादायक ठरते. त्यामुळेच रोजच्या जीवनात बनावटी दागिने हा महिलांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.

सध्याच्या काळात वाढत्या महागाईमुळे सोन्याचे दागिने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये भाडे तत्तवावरील  दागिने घालून लग्न समारंभांत किंवा पार्टीत मिरवले जाते. त्याच दागिन्यांची भुरळ आता सर्वसामान्य महिला वर्गाला पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांऐवजी भाडे तत्तवावरील दागिन्यांना पसंती दिली जात आहे. शहरातील बहुतांश सौंदर्य प्रसाधनगृहांमध्ये हे दागिने उपलब्ध केले जात आहेत. त्यामुळे लग्नसराईत सोन्याच्या दागिन्यांऐवजी ही दागिने आपली छाप पाडू लागले आहेत. वधूचा पेहराव कसा आहे, याच्याशी जुळणारे दागिनेदेखील भाडेतत्त्वावर उपलब्ध होत आहेत. कमी खर्चात हवे तसे दागिने मिळत असल्याने या दागिन्यांना मागणी वाढली आहे, असे मेकअप आर्टिस्ट इंदिरा गायकर यांनी सांगितले.

हल्लीच्या काळात महिलांची जीवनशैली बदलली आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत सोन्याचे दागिने घातले तर काम बाजूला राहून ते सांभाळण्याचीच कसरत करावी लागते. अशा वेळी या दागिन्यांचा मोठा आधार वाटतो. यामुळे व्यक्‍तिमत्त्वही प्रभावी दिसते. कपड्यांबरोबर एकसंध दिसणाऱ्या दागिन्यांना हल्ली पसंती दिली जात आहे. 

विविधतेसह आकर्षक, फायदेशीर
भाडे तत्वावरील दागिन्यांचा फायदा असा, की यात दागिने अगदी आकर्षक असतात. विविध प्रकारचे दागिने घालायला मिळतात. उदा. बांगड्यांमध्ये वेगवेगळी नक्षी, मंगळसूत्रामध्ये गळ्याबरोबरचे, लांब मंगळसूत्र, साखळीमधील किंवा फक्त काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असे विविध प्रकार घालता येतात. कानातील रिंगही वेगळ्या बनावटीमध्ये आणि आकर्षक आकारात, रंगात मिळतात. त्यामुळे एकसंधपणाचा प्रश्‍नही मिटतो आणि रोज तेच तेच दागिने घालून कंटाळाही येत नाही. तसेच हे दागिने हरवले तर फारसे दु:खही होत नाही. त्यामुळे हे दागिने खूपच फायदेशीर ठरतात.

वधूच्या वस्त्रप्रावरणाशी जुळतील असे दागिने
वधूचा मेकअप असेल तर पेहेरावानुसार दागिने दिले जातात. यात पूर्ण सेट- त्यात कानातले, हातातले असतात. बिंदी, कमरपट्टा, नऊवारी साडीवरील दागिने वेगळे दिले जातात. यासाठी दोन ते अडीच हजार रुपये भाडे आकारले जाते. ५०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत भाडे घेतले जाते. सोने-चांदीच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये फारशी विविधता नसते, परंतु, भाडे तत्वावरील दागिन्यांमध्ये ही विविधता आनंददायी ठरते.

पूर्वीपेक्षा सध्या भाडे तत्वावरील दागिन्यांची मागणी वाढली आहे. जसा पेहराव असेल त्यानुसार दागिने दिले जातात. सध्या दक्षिण भारतीय दागिन्यांना मागणी वाढली आहे. भाडे तत्त्वावर दागिने मोठ्या प्रमाणत घेतले जातात. दागिन्यांनुसार हे भाडे घेतले जाते.
- इंदिरा गायकर, मेकअप आर्टिस्ट.

भाडे तत्वावरील दागिने बहुतांश लग्न किवा इतर समारंभांत वापरले जातात. तसेच प्रत्येक वेळी दागिने खरेदी करणे शक्‍य होतील असे सांगता येत नाही. त्यामुळे कमी भाड्यात लाखो रुपये किमतीचे दागिने लग्नात शोभा वाढवतात.
- श्‍वेता मढवी, महिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com