अखेर ठरले! कल्याणच्या पत्रीपुलाचे काम महिनाभरात पूर्ण होणार, सततच्या वाहतूक कोंडीतून सुटका 

शर्मिला वाळुंज
Wednesday, 12 August 2020

नियमित वाहतूक कोंडीने त्रासलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांची लवकरच या त्रासातून सुटका होणार आहे. कल्याण पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणाऱ्या आणि वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या बहुचर्चित पत्रीपुलाचे काम महिनाभरात पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी या पुलाच्या बांधकामाचा आढावा घेऊन ही माहिती दिली. 

ठाणे : नियमित वाहतूक कोंडीने त्रासलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांची लवकरच या त्रासातून सुटका होणार आहे. कल्याण पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणाऱ्या आणि वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या बहुचर्चित पत्रीपुलाचे काम महिनाभरात पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी या पुलाच्या बांधकामाचा आढावा घेऊन ही माहिती दिली. 

क्लिक करा : किमान परतीच्या प्रवासासाठी तरी रेल्वे सोडा; कोकणवासीय संतप्त

18 नोव्हेंबर 2018 ला या पुलाचे तोडकाम करण्यात आल्यानंतर पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याबाबत 'तारीख पे तारीख' घोषित करण्यात आल्या. मात्र, कोरोनाच्या विघ्नात संथगतीने सुरू असलेल्या या पुलाचे बांधकाम सध्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. खासदार शिंदे यांनी बुधवारी कल्याण-शिळफाटा ते भिवंडी या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार व वाहतूक विभाग उपायुक्त अमित काळे उपस्थित होते. 

कल्याण-शिळ रस्त्यावर नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याची दखल घेत खासदार डॉ. शिंदे यांनी बुधवारी कल्याण-शिळफाटा ते भिवंडी या रस्त्याची पाहणी केली. या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोणत्या उपाययोजना अमलात आणता येतील, याविषयी खासदार शिंदे यांनी या दौऱ्यादरम्यान चर्चा केली.

नक्की वाचा : आदिवासी पाड्यांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडत नाही खंड; भिवंडीतील दाम्पत्य जोपासताहेत शिकवण्याचा छंद

भिवंडी- कल्याण- शिळफाटा रस्त्याच्या सहापदरी रुंदीकरणाचे काम सुरू असून लॉकडाऊनच्या काळात कामगार नसल्याकारणामुळे हे काम संथगतीने सुरू होते, परंतु आता तीही समस्या दूर झाली असून हे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचना या वेळी खासदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

एकमार्गी वाहतुकीचा विचार 

  • कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतूककोंडीचा विचार करता ग्रामीण भागाच्या सीमा या रस्त्यास जोडल्या आहेत. त्यामुळे तेथे "एकमार्गी' वाहतूक व्यवस्था करणे किंवा इतर काही उपाययोजना अमलात आणता येतील का, याचा विचार केला जात आहे. 
  • पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून बुजवले तरी त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे आवश्‍यक त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉकचा वापर करून खड्डे बुजवण्यात यावेत, अशा सूचना खासदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
  •  
  • कल्याण-शिळफाटा मार्गावरील मध्यम क्षेत्रासाठी आरक्षित असलेली जागा रहदारीकरिता वापरल्यास वाहतुकीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ही जागा मोकळी करून पेव्हर ब्लॉक टाकून वाहतुकीसाठी ती उपलब्ध करावी, अशी सूचनाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. 
  • -----------------------
    (संपादन : प्रणीत पवार)
     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of Patripul will be completed within a month, People will get relie from traffic jam.