जागतिक स्तन कर्करोग जागरुकता महिना- ऑक्टोबर २०२०

भाग्यश्री भुवड
Thursday, 15 October 2020

मुंबईतील अपेक्स हॉस्पिटल समूहातील बोरीवली येथील अपेक्स ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये अनेक कर्करोग रुग्णांची परवड झाल्याचे समोर आले आहे. 

मुंबईः  कोरोनाच्या पहिल्या महिन्यापासूनच देशभरातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णालयांतून सामान्य रुग्णांवर उपचार करणे जवळपास बंद झाले होते. महाराष्ट्रात केवळ खासगीच नव्हे तर सरकारी आणि महापालिका रुग्णालयांतही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू सामान्य रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया वाढू लागल्या असल्या तरी आजही त्या पुरेशा वेगाने होताना दिसत नाही, त्यामुळे कर्करोग रुग्णाची परवड होताना दिसत आहेत. 

मुंबईतील अपेक्स हॉस्पिटल समूहातील बोरीवली येथील अपेक्स ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये अनेक कर्करोग रुग्णांची परवड झाल्याचे समोर आले आहे. 

याविषयी अपेक्स सुपर स्पेशालिटीच्या लॅप्रोस्कॉपीक शल्यविशारद डॉ. अदिती अग्रवाल म्हणाल्या, " गेल्या सहा महिन्यात अनेक कर्करोग रूग्णांनी कोरोना संक्रमणाच्या भीतीने पुढे ढकलल्या. त्यामुळे अनेक रुग्णांना याचा त्रास होताना दिसत आहे. ऑक्टोबर हा महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेरनेस म्हणजेच स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरुकता आणण्यासाठी पाळला जातो आणि याच निमित्ताने पश्चिम उपनगरात महिलांचे एक मोफत सल्ला शिबीर (ऑनलाईन )आणि एक सर्वेक्षण केले.

या सर्वेक्षणामध्ये मालाड ते पालघरमधील महिलांशी फोनवर बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता अनेक महिलांनी कर्करोगाची ठळक लक्षणे आढळून आली असतानाही लॉकडाउन असल्यामुळे पुढील तपासणी अथवा उपचार घेतले नाहीत. नालासोपारा येथे राहणाऱ्या एका महिलेला मे महिन्यात डाव्या स्तनामध्ये ३ सेंटीमीटरची गाठ आढळून आली होती, पण वाहतुकीची साधने नसल्यामुळे तिने पुढील उपचार केले नाही, तीन महिन्यांनी जेव्हा ती उपचारासाठी आली तेव्हा ही गाठ डबल आकाराची झाली होती. 

अधिक वाचाः  Viral Video: कठड्यावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून शोध सुरु

एक कर्करोगग्रस्त महिलेने वाहतुकीची सोय नसल्यामुळे रेडिओथेरेपी थांबवल्याचे लक्षात आले. एक मुलगी आपल्या भावासोबत लॉकडाऊन काळामध्ये रेडीएशन थेरपी घेण्यासाठी जात होती. मात्र तिच्या आईला कोरोना झाला आणि तिने आपली ट्रीटमेंट थांबवली. कारण तिला 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवले होते. आम्ही अनेक महिलांशी बोलून त्यांना आपले उपचार परत सुरु करण्यास सांगितले. तसेच अनेक महिलांना आम्ही रोज फोनवरून समुपदेशन करत आहोत.

कर्करोग हा आता पूर्वीसारखा गंभीर आजार राहिलेला नाही. कारण भारतामध्ये अनेक आधुनिक उपचार उपलब्ध असून कर्करोगावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य झाले आहे. मात्र भीती आणि लाजेपायी आजही 60 टक्के रुग्ण अंतिम टप्प्यामध्ये कर्करोग आल्यानंतर डॉक्टरकडे येतात, अशावेळी त्यांच्यावर उपचार करणे कठीण होऊन जाते. लॉकडाऊन काळामध्ये कर्करोगच नाही तर अनेक गंभीर रोगांवर दुर्लक्ष झाले आहे. याच सामाजिक जाणिवेतून अपेक्स ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकतर्फे आम्ही हा उपक्रम राबवला असून अनेक महिलांना ऑनलाईन तसेच फोनवर मार्गदर्शन केले जात आहे.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

World Breast Cancer Awareness Month October 2020


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Breast Cancer Awareness Month October 2020