Pause; Take a deep breath in; Relax!

देवयानी एम. 
Tuesday, 13 October 2020

दिवसातील थोडा तरी वेळ शुद्धिक्रिया, योगासने, प्राणायाम, ध्यान यासाठी बाजूला काढावा. हीच तुमच्या वर्तमान व भविष्याच्या आरोग्यासाठी केलेली सर्वांत उत्तम गुंतवणूक ठरेल!

नैसर्गिक, सर्वांत सहज होणारी श्वसनक्रिया सर्वाधिक दुर्लक्षित राहते. अनेकदा असं होतं, की आपली सर्वांत जवळची गोष्ट किंवा व्यक्तींना आपण गृहीत धरतो? आज या ‘लाइफलाइन’विषयी खोलात जाऊन ती कशी सुधारता येईल, ते पाहू.  मागच्या मंगळवारी श्वसनसंस्थेचं कार्य व त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासले. आता हठयोगातील शुद्धिक्रिया, आसनं, प्राणायाम, बंध यांचा सराव का करावा व काय केल्यानं श्वसनसंस्थेचं आरोग्य उत्तम प्रकारे टिकवता येईल, ते पाहू!

शुद्धिक्रिया 
हठयोगात सहा शुद्धिक्रिया (षट्कर्म) सांगितल्या आहेत. त्यातील काही शुद्धिक्रिया श्वसन कार्य सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ‘नेती क्रिया’ (जल नेती व सूत्र नेती) ही नासिका व सायनस स्वच्छ ठेवण्यास मदत करते. विविध ॲलर्जी हळूहळू कमी होऊ लागतात. तसेच ‘वमन धौती’ हीदेखील अत्यंत लाभदायक शुद्धिक्रिया आहे. श्वसनमार्गातील अशुद्धी नाकातील वाढलेल्या स्रावांमार्गे शरीराबाहेर टाकली जाते. ‘शंख प्रक्षालन’ व ‘बस्ती’ या क्रियांमुळे पचनसंस्थेची संपूर्ण सफाई होते, त्यामुळे श्वासपटलाचे (diaphragm) कार्य सुधारते, जे श्वसनासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर ‘कपालभाती’ या क्रियेमुळे फुप्फुसातील घाण व दीर्घकाळ साचलेली अशुद्ध हवा बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ हवा भरली जाते, जे नेहमीच्या श्वसनात होत नाही.

आसने
मागील लेखात आपण छातीच्या स्नायूंचे श्वसनकार्यात काय महत्त्व आहे, ते पाहिलेच. त्यामुळे छातीच्या स्नायूंचे प्रसरण व त्यांचा विस्तार करणारी आसने, जसे भुजंगासन, उष्ट्रासन, उत्तानमण्डुकासन इत्यादी नियमित केली पाहिजेत. तसेच, छातीच्या मागच्या भागाचा विस्तार होतो त्या पुढे वाकून करण्याच्या आसनांनी, जसे पश्चिमोत्तानासन, योगमुद्रा इत्यादी. छातीच्या डाव्या व उजव्या बाजूसाठी कोनासन, अर्ध कटिचक्रासनासारखी आसने सरावात असावीत. पीळ देणारी आसने जसे त्रिकोणासन, कटिचक्रासन देखील खूप महत्त्वाची आहेत.

हेही वाचा : "योग ‘ऊर्जा’ : जीवेत् शरद: शतम्

प्राणायाम
श्वसनाच्या आरोग्यासाठी सर्वांत उपयोगी काय असेल तर प्राणायाम! फुप्फुसांची क्षमता, त्यांचा पद्धतशीरपणे केलेला विस्तार आणि वायुकोशांची लवचिकता, या गोष्टी वाढविण्यासाठी प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. मेंदूतील उत्तेजित केंद्रे शांत होण्यासाठी व स्ट्रेस कमी करण्यासाठी प्राणायामाचा अभ्यास अत्यंत प्रभावी ठरतो. यासाठी दीर्घ श्वसन, उज्जयी, ओंकार, भ्रामरी यांचा नियमित सराव करावा.

योग ऊर्जा : अनिश्‍चिततेत आशेचा किरण

बंध
उड्डीयान बंधाच्या सरावाने छातीचे स्नायू चांगल्या प्रकारे कार्यान्वित होतात. श्वासपटल पूर्णपणे वरच्या बाजूला खेचले जाते व त्याचे आरोग्य सुधारते. या बंधामुळे दीर्घ श्‍वास घेण्याची तयारी आणखी जास्त होऊ लागते. फुप्फुसांची क्षमता वाढते, अशा प्रकारे संपूर्ण श्वसनयंत्रणेसाठी उड्डीयान बंध अत्यंत उपयुक्त आहे.

फिटनेस

हेल्थ

MYFA

पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devyani-m-writes-article-about Yoga pranayama meditation