चेतना तरंग : वीरता, समाधी आणि प्रज्ञा 

श्री. श्री. रवीशंकर 
Tuesday, 13 October 2020

श्रद्धा उत्पन्न झाल्यावर स्मृती निर्माण होते, वीरता संचारल्यावर समाधी घडते, प्रज्ञा येते. सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात. 

आपण मनाच्या चेतनेच्या बाबींवर चर्चा करत आहोत. यातील तिसरी गोष्ट म्हणजे वीरता, ‘वीर्य’. ही वीरता १०० टक्के असायला हवी. आपले हक्क, अधिकार सोडण्याचे धैर्य. सैन्यातल्या लोकांना तुम्ही पाहिले आहे का? किंवा ज्यांनी स्वत:ला एखाद्या कार्याला १०० टक्के वाहून घेतलेले आहे त्यांना पाहिले आहे का? तुम्ही बारीक नजरेने त्यांच्याकडे पाहिल्यास त्यांच्याबद्दल आपल्याला आकर्षण वाटायला लागेल. त्यांच्यात ऊर्जा ओतप्रोत भरलेली असते. ते नेहमी १०० टक्के योगदान देत असतात. त्यासाठी आपले आयुष्यपणाला लावतात. 

तामिळनाडूमधील विरपांडी कट्टाबोमन या राजाला शौर्याबद्दल अतिशय मानतात किंवा कित्तुर चेनम्मा या कर्नाटकातील राणीला तिच्या वीरतेबद्दल लोक अजूनही नावाजतात. किंवा इतर प्रांतातल्या एखाद्या शूरवीराला लोक आदरांजली वाहतात. कारण काही झाले, तरी त्यांनी आपले शौर्य १०० टक्के पणाला लावलेले असते. यालाच ‘वीर्य’ म्हणतात. अशा लोकांचे शौर्य, धैर्य ती उर्जाशक्ती वाखाणण्यासारखी असते. त्यांची एकाग्रता, शौर्य, निर्भयता आणि खळखळणारी ऊर्जाशक्ती त्यांना वीरत्व बहाल करून जाते. 

चेतना तरंग : श्रद्धा आणि स्मृती

चौथी गोष्ट म्हणजे, ‘समाधी’. समाधी म्हणजे काय? मन शांत असते, समतोल स्थितीत असते, विचलित होणारे नसते त्या अवस्थेला ‘समाधी’ म्हणतात. अशा अवस्थेत मनाची थोडीफार चलबिचल झाल्यास मन लगेच पूर्ववत होते. मनाच्या अशा अवस्थेलाच समाधी म्हणतात. अशा अवस्थेत मन भूतकाळाला धरून बसत नाही किंवा भविष्याची चिंता करत नाही. संताप, दुःस्वास आणि आसक्ती यांची बंधने त्यावेळी मनावर नसतात. मन अशावेळी कोणाचाच द्वेष करत नसते किंवा त्याला कसलीच आसक्ती नसते. तुमच्या हे लक्षात येते आहे का? 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनात अशावेळी कसली तीव्र इच्छा नसते, उतावीळपणा नसतो किंवा कोणाबद्दल तिरस्कार नसतो. ‘‘हे बरोबर नाही, मला ते नको आहे, मला फक्त हेच हवे आहे, हे मी सहन करू शकत नाही,’’ असले कोणतेच विचार मनात येत नाहीत, तेव्हा ते समाधी अवस्थेत असते. या अवस्थेत कसला पश्चात्ताप नसतो, संताप नसतो किंवा कसली भीतीही नसते. एका कोपऱ्यात नुसत्या स्वस्थ बसण्याला समाधी म्हणत नाहीत. समाधीचे अनेक प्रकार असतात. ‘समत्वं योग उच्यते,’ म्हणजे मनाचा समतोलपणा, मनाचा एकोपा असे संतुलित मनच जीवनाला पूर्णत्व देऊ शकते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेवटची गोष्ट म्हणजे ‘प्रज्ञा’. सजगपणे आणि मनाच्या पूर्ण सामर्थ्यानिशी करण्यात येणाऱ्या कृत्याला प्रज्ञा म्हणतात. कोणाला रागवायचे असल्यास जाणीवपूर्वक रागवा. मला काय म्हणायचे आहे, तुमच्या लक्षात येते का? आपण संतापल्यावर आपला तोल जातो. कोणाची स्तुती करतानाही आपण वाहत जातो. सतत अशा गोष्टींची काळजी घेण्यालाच ‘प्रज्ञा’ म्हणतात. 

श्रद्धा, स्मृती, वीर्य, समाधी आणि प्रज्ञा या पाच गोष्टींमुळे आयुष्याला पूर्णत्व येते. यालाच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ अर्थात जीवन जगण्याची कला म्हणतात. वरील गोष्टी तुम्ही काही प्रमाणात पाळण्याचा प्रयत्न केलात किंवा निदान त्यातली एक गोष्ट पूर्णपणे आत्मसात केल्यास बाकीच्या गोष्टी आपोआप त्याच्या मागे येतील. श्रद्धा उत्पन्न झाल्यावर स्मृती निर्माण होते, वीरता संचारल्यावर समाधी घडते, प्रज्ञा येते. सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sri sri ravi shankar article about Bravery

Tags
टॉपिकस
Topic Tags: