इनर इंजिनिअरिंग : क्रोधाच्या अग्नीतून करुणेच्या सागरात...

Sadguru
Sadguru

लोक मला नेहमी विचारत असतात, त्यांचा राग ते कसा नियंत्रणात ठेवू शकतात. कुणी कितीही जरी उपदेश केला – ‘राग करू नये,’ तरी काही परिस्थिती निर्माण झाल्यावर तुम्ही संतापताच. भावनिक अवस्था, ज्याला तुम्ही क्रोध, द्वेष, वासना, करुणा, प्रेम असं म्हणता – अगदी खालच्या पातळीपासून ते उच्चस्तरीय भावना, या सगळ्या एकाच ऊर्जेच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत. अनेक लोकांसाठी, त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनुभवलेली सर्वांत तीव्र भावनिक अवस्था म्हणजे क्रोध. लोकांना कधीकधी एक प्रकारची प्रखर उत्कटता हवी असते. उत्कट कसं राहावं, हे त्यांना माहीत नसतं. एखादी शारीरिक कृती किंवा संताप किंवा वेदना केवळ याच भावनिक अवस्थांमधून कशी तीव्रता अनुभवावी हे त्यांना माहीत असतं.

त्यामुळेच मादक पदार्थ, सेक्स या गोष्टींना आज जगात इतकं अवास्तव महत्त्व प्राप्त होण्यामागचं कारण हेच आहे की, लोकांना, काही ना काही प्रकारे, काही क्षण का होईना, एक प्रखर उत्कटता अनुभवायची असते.

त्यातली उत्कटताच त्यांना आकर्षित करते आणि माणूस सतत तिच्या शोधात असतो, पण उत्कटता ही एकमेव गोष्ट मनुष्याला त्याच्या वर्तमान बंधनातून सुद्धा मुक्त करू शकते. दुर्दैवानं, बहुतेक लोकांसाठी त्यांचा क्रोध, भीती, द्वेष याच भावना त्यांच्या आयुष्यात फार प्रखर असतात. त्यांचं प्रेम कधीच इतकं उत्कट नसतं, त्यांची शांती कधीच इतकी तीव्र नसते, त्यांचा आनंद सुद्धा कधीच इतका उत्कट नसतो, पण त्यांच्या नकारात्मक भावनाच अतिशय उत्कट असतात. म्हणूनच ते या नकारात्मक भावनांमध्ये एक प्रकारची ताकद अनुभवतात. क्रोध ही एक प्रचंड उत्कटता असते. पण ती अशी तीव्रता आहे, जी तुम्हाला तुमच्यासाठी हानिकारक ठरते. ही अशी तीव्रता आहे जी तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटात टाकू शकते, तुम्हाला आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांचा अनेक प्रकारे नाश करू शकते. पण ही उर्जा तुम्ही एका विशेष प्रकारे परिवर्तीत केली, तर ती स्वाभाविकपणे प्रेम आणि करुणा बनते – आणि मग कुणीच तुम्हाला नैतिकतेचे धडे देण्याची गरज उरणार नाही. आणि मग जसजशी ही प्रक्रिया अधिक सखोल होत जाईल, तसे तुम्ही तुमच्या जागरूकतेच्या शिखरावर पोचाल आणि सर्व प्राणीमात्रांशी एकरूपता अनुभवाल.

समजा तुम्ही स्वतः, तुमच्या सभोवतालच्या लोकांचाच एक अविभाज्य अंग म्हणून अनुभवू लागल्यास कुणीच तुम्हाला सदाचरणी व्हायला सांगायची किंवा कोणाला हानी पोचवू नका, हत्या करू नका, असं सांगण्याची गरजच उरणार नाही. तुम्ही स्वानुभवाने या सृष्टीचाच एक अंश आहात अशी प्रचीती आल्यावर तुम्ही परिस्थितीनुसार जे गरजेचं आहे ते कराल, पण क्रोधरहित. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करता. पण जर तुम्ही ते संतापानं, द्वेषानं कराल तर त्याला काहीच मोल नाही - मग ते काहीही असो.

योगाची संपूर्ण प्रक्रिया यावरच आधारित आहे. एकदिवस असा येईल की, जरी तुम्हाला अतिशय टोकाच्या परिस्थितीला सुद्धा सामोरं जावं लागलं, तरी तुमचे चैतन्य अगदी स्थिर असेल. तुम्ही कसा प्रतिसाद द्याल हे तुम्ही कोण आहात, तुमची सभोवतालची परिस्थिती काय आहे, तुमची क्षमता, कौशल्य काय आहे यावर अवलंबून असेल. जेव्हा तुम्ही एकूण जीवसृष्टीच्या दृष्टीकोनातून कृती करता, तेव्हा तुम्ही तुमच्या वैयक्तिक ओळखीरहित कृती करता. आणि केवळ तेव्हाच तुम्ही तुमच्या संपूर्ण बुद्धिमत्तेनेशी कृती करू शकाल. योगाचा अर्थ आहे तुमच्या ऊर्जेची अशा प्रकारे मशागत करणे जेणेकरून हळूहळू ती तुमच्या भौतिक मर्यादा मोडून पाडू लागते आणि तुम्हाला जागृतीच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाते. अर्थात, तुमच्यातील मानवी शक्यता बहरून, फुलून आणते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com