esakal | लॉकडाउनमधील ‘ऑनलाईन’ योगसाधना 
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनमधील ‘ऑनलाईन’ योगसाधना 

लॉकडाउनमुळं बाहेरची हालचाल आणि एकंदर स्वातंत्र्य सीमित असलं,तरी तंत्रज्ञानामुळे आपल्या दिवसातील व्यायामाची वेळ राखीव ठेवून दिवसाचे नियोजन करणं शक्य होतं.ऑनलाईन योगवर्ग हे या काळात ठरलेलं वरदान आहे.

लॉकडाउनमधील ‘ऑनलाईन’ योगसाधना 

sakal_logo
By
देवयानी एम., योग प्रशिक्षक

माणसाला तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आनंद, अर्थपूर्णता आणि आव्हान. कोणतंही काम करताना हे तीन पैलू साध्य होत असतील, तर प्रगती निश्चित आहे. पण आपल्याला वाटतं तसं अनुशासित आयुष्य किंवा शिस्तबद्धता या यावरील घटकांच्या आड येत नाही, किंबहुना या सर्वांचा आवश्यक असा घटक म्हणजे स्वयंशिस्त किंवा ‘सेल्फ डिसिप्लीन’. मग बाहेर कशीही परिस्थिती असली, तरी आपल्या दिनचर्येची शिस्तबद्धता टिकवून केलेले काम हे आनंद आणि अर्थपूर्णता देणारं ठरेल. लॉकडाउनमुळं बाहेरची हालचाल आणि एकंदर स्वातंत्र्य सीमित असलं, तरी तंत्रज्ञानामुळे आपल्या दिवसातील व्यायामाची वेळ राखीव ठेवून दिवसाचे नियोजन करणं शक्य होतं. ऑनलाईन योगवर्ग हे या काळात ठरलेलं वरदान आहे. याची पावती म्हणजे माझ्याकडं योग शिकायला येणाऱ्यांचे समाधानी चेहरे आणि मेसेजेस, ज्यानं माझं बळ रोज कित्येक पटीनं वाढतं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जनरल फिटनेस 
आधी नियमित व्यायाम करत असाल, तर तो आता थांबवण्याचं काहीच कारण नाही. घरूनदेखील तेच बलोपासनेचं रुटीन चालू ठेवू शकता. व्यायाम न करणाऱ्यांना मी सांगेन ‘हीच ती वेळ’. पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था, अंतःस्रावी प्रणाली, प्रजनन संस्था, स्नायूंची लवचिकता, पोश्चर, स्टॅमिना हे सर्व या निर्बंधाच्या काळातही उत्तम प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी नियमित योगासनं व प्राणायाम गरजेचा आहे. भूक-झोप, त्यांच्या वेळा यांचे नियमन योगाच्या साहाय्याने शक्य आहे. 

Video : योग ‘ऊर्जा’ : दररोज २० मिनिटे स्वतःसाठी

वजन कमी करायचं असल्यास... 
अनेकदा काही अवघड किंवा किचकट गोष्टी साध्य करायच्या असल्यास, आपण स्वतःला डेडलाईन किंवा चॅलेंज देतो. असं म्हणतात, कुठलीही सवय बदलायला किंवा लावायला २१ दिवस लागतात. पहिल्या लॉकडाऊनपासून असे २१ दिवस होऊन गेले. बऱ्याचदा कोणाबरोबर तरी किंवा प्रशिक्षकांच्या मदतीनं आव्हान स्वीकारून त्यासाठी केलेले बदल व प्रयत्न अधिक परिणामकारक ठरतात. असे चॅलेंज स्वतःला द्या आणि वजन कमी करण्याच्या दृष्टीनं परिश्रम घ्या. 

गर्भवती स्त्रिया 
आता चालण्याला मर्यादा आल्या असल्यानं गर्भवती स्त्रियांच्या व्यायामाकडं जास्त स्मार्टली बघण्याची गरज आहे. त्यांचं पोश्चर, पाठदुखी, थकवा, स्टॅमिना, मानसिक ताण, मूड, झोप, प्रेग्नंसीमध्ये वाढलेलं वजन, लेबरमध्ये होणारा त्रास, डिलिव्हरीनंतरची रिकव्हरी, गरोदरपणातील मधुमेह, स्ट्रेस, डिप्रेशन, अँग्झायटी, रक्तदाब, बद्धकोष्ठता, आईबरोबरच बाळाचं आरोग्य या सर्वांसाठी उत्तम उपाय म्हणजे गरोदरपणातील पूरक अशी योगासने, प्राणायाम. 

‘होम मिनिस्टर’च्या पाठीचे आरोग्य 

ज्येष्ठ नागरिक 
सध्या सर्वांत जास्त धास्ती व काळजी कोणाची असेल, तर ज्येष्ठ नागरिकांची. त्यांचे आरोग्य, चलनवलन, मनोधैर्य, त्यांच्या कलानं संभाळून करण्याचा व्यायाम घेणारे ऑनलाईन योग वर्ग हे त्यांचा मानसिक व शारीरिक आधारस्तंभ ठरतील. 

मानसिक आरोग्य 
अवघड परिस्थितीतदेखील शांती, आनंद, उत्साह, सकारात्मकता टिकवणे, ही आपल्या आंतरिक प्रगतीची लक्षणं आहेत. जे नाही ते घोळवत न बसता, जे आपल्याजवळ आहे ते मध्यवर्ती ठेवून आयुष्याकडं बघणं, असा समाधानी दृष्टिकोन (Attitude of Gratitude) जोपासायला शिकलं पाहिजे. भीती, चिंता, अनिश्चितता, एकटेपणा, मानसिक थकवा हे सर्वत्र असूनही, अवघड परिस्थितीत डोकं शांत ठेवून मार्ग काढणं, यासाठी योगाची साथ हवी. योगानं तुमच्या आत असलेली उदंड क्षमतेची प्रचिती येईल, ज्या गुणांवर सावट आलं आहे ते साफ होऊन उच्च कार्यक्षमता व धैर्य व्यक्त होईल. या परिस्थितीतही करण्यासारखं खूप काही आहे, मार्ग शोधला तर उत्तरं नक्कीच सापडतील. खचून जाऊ नका, सगळे ठीक होण्याची वाट पाहू नका, आहात तिथून ध्येयापर्यंत पोचता येणं तंत्रज्ञानानं शक्य केलं आहे. हे तंत्रज्ञान दुर्दैवानं समाजातील सर्व स्तरांतील लोकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळं ज्यांना ही सुविधा सहज लाभली आहे, त्यांनी याचा योग्य उपयोग करून घ्यावा.