तुमची पचनाची तक्रार आहे? जाणून घ्या, पचनक्रियेची माहिती

devayani
devayani

आपण आज पचनसंस्था अगदी थोडक्यात समजून घेऊ. पचन ही एक रासायनिक प्रक्रिया आहे, ज्यात आपण खाल्लेले अन्न पचनग्रंथींच्या स्रावांच्या संमिश्रणाने सरल रेणूंमध्ये रुपांतरित होते. 

पचनसंस्थेचे दोन भाग 
१.अन्ननलिका 
अन्ननलिका तोंडापासून सुरू होऊन पुढे घसा, जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार अशी बनलेली असते. 

२. पचनग्रंथी 
लाळ उत्पादक ग्रंथी, जठर, यकृत, स्वादुपिंड, आणि लहान आतडे यांचा समावेश असतो. तोंडात भौतिकीय (mechanical) प्रक्रिया, जठरात रासायनिक (chemical) प्रक्रिया, पुढे अभिशोषण (absorbtion) आणि मलविसर्जन (excretion) अशी संपूर्ण पचनक्रिया असते. 

आपण खाल्लेले अन्न लाळेत विरघळायला सुरुवात होते, तेव्हा काही प्रमाणात पचनक्रियेला सुरुवात होते. घशातून पुढे गेलेले अन्न पोटातील स्रावांमुळे रासायनिक प्रक्रियेला सुरुवात करते. एखाद्या लाटेप्रमाणे लयीत पोटाची हालचाल होत त्यातील कर्बोदके, मेद, प्रथिने यांचे सरल रेणूंमध्ये रूपांतर व्हायला लागते. मग अर्धवट पचलेले अन्न लहान आतड्यात जाण्यास तयार होते. साखरेचे अधिकतम पचन लाळेच्या माध्यमातून तोंडातच होते. प्रथिने ५० टक्के जठरात आणि ५० टक्के लहान आतड्यात आणि मेद लहान आतड्यात पचवली जातात. दहा फूट लांब वेटोळे घातलेल्या लहान आतड्यापर्यंत ९० टक्के पचनक्रिया संपलेली असते. त्यानंतर पाच फूट लांब व अडीच इंच रुंद असलेल्या मोठ्या आतड्यात पचन होत नाही. त्यातून पाणी, क्षार, खनिजे आणि व्हिटॅमिनचे अभिशोषण होऊन उरलेले पदार्थ मल स्वरूपात शरीराच्या बाहेर फेकले जातात. आता आपण पचनासाठी सहसा दुर्लक्षित झालेले महत्त्वाचे मुद्दे पाहू. 

१. सावकाश खावे 
हळू-व्यवस्थित चावलेले, लाळेत मिश्र झालेले अन्न पोटात जायला हवे. कारण साखरेचे पचन तोंडातच होत असते. भराभर खाण्याने लाळेत न विरघळता अन्न पोटात गेले तर पोटाच्या आम्लीय (acidic) वातावरणात साखरेचे पचन नीट होत नाही. अन्न लहान आतड्याद्वारे मोठ्या आतड्यात पोचते. मोठ्या आतड्यामध्ये खूप प्रमाणात असलेले जंतू व बॅक्टेरिया सशक्त होऊन गॅस तयार करतात. 

२. खाताना बोलू नये 
खाताना बोलण्याने बाहेरील हवा अन्नाबरोबर पोटात जाते. अशाने गॅसचे छोटे बुडबुडे तयार होतात व ते एकत्र येऊन ढेकर तयार होते. हवा वरच्या दिशेने आली नाही आणि लहान आतड्यात गेली तर आतड्याच्या आवरणाला त्रास होतो आणि त्यातून पोटदुखी निर्माण होते. 

३. अति तिखट-मसालेदार पदार्थ टाळावे 
मध्यम स्वरूपाचे तिखट अन्न खाल्ल्याने पचनग्रंथीला चालना मिळते, ज्याने पचनाची गती वाढते. परंतु, अति तिखट व मसालेदार खाण्याने तोंड, घसा, अन्ननलिका आणि जठरातील श्लेष्मल त्वचेला (mucous membrane) त्रास होतो. अशाने गॅस्ट्रायटिस, हार्ट बर्न, जडत्व इ. प्रकार होतात. 

४. मनाची अवस्था – 
पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था पचन कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते, परंतु दुःख, ताण, चिडचिडेपणा असतो तेव्हा सिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते, ज्याने पचनग्रंथींचे काम मंद होते आणि पचनक्रिया नीट होत नाही. म्हणून शांत-आनंदी मनाने अन्न ग्रहण करावे. 

५. पोट रोज साफ व्हावे 
मोठ्या आतड्यामध्ये पाणी शोषले जाऊन उरलेले मल बाहेर फेकण्यास तयार असते. पोट रोज साफ झाले नाही, तर अधिक पाणी शोषले जाऊन मल कडक व्हायला लागतो. तो बाहेर पडण्यास त्रास होऊ लागतो. गॅस, तोंडाला घाण वास येणे, पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, चिडचिडेपणा, मुळव्याध, फिशर यांसारखे त्रास होऊ लागतात व हीच घाण पुन्हा रक्तात शोषली जाते. आहारात पालेभाज्या, फळभाज्या भरपूर प्रमाणात असल्यास पोट उत्तम प्रकारे साफ होण्यास मदत होईल. 

६. लक्षात ठेवा – 

* खाल्ल्या-खाल्ल्या‌ लगेच झोपू नये किंवा आडवे पडू नये. अशाने पोटातील ॲसिड वर येते आणि ॲसिड रिफ्लक्स, हार्ट बर्नसारखे त्रास होतात. म्हणूनच आपल्या संस्कृतीत शतपावली आणि वामकुक्षी असे शब्द शास्त्राला धरूनच आलेले आहेत. 

* पचन संस्थेचे आरोग्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. आज आपण प्राथमिक स्वरूपाची माहिती समजून घेतली. पुढील लेखात योगातील शुद्धीक्रिया, आसने, प्राणायाम व ध्यान यांचा पचनसंस्थेचे आरोग्य सुरळीत राहण्यास कसा उपयोग होतो ते पाहू. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com