esakal | हसण्यासाठी जगा - ‘नव्या मनात, सकारात्मकतेची गुढी’!

बोलून बातमी शोधा

padwa

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घराघरांत आवराआवरी, साफसफाई करण्यात येते. नवीन वस्तू विकत घेतल्या जातात. नव्या वास्तूत लोक राहायला जातात. गुढीपाडव्यानिमित्तानं आपलं मन सकारात्मक करण्याची संधी आपण घेऊया.

हसण्यासाठी जगा - ‘नव्या मनात, सकारात्मकतेची गुढी’!
sakal_logo
By
मकरंद टिल्लू

आजकाल बंद पाकिटांत धान्यं मिळतात. पूर्वी घराघरात उन्हाळ्यात निवडणं, पाखडणं केली जायची. यासाठी  ताटामध्ये धान्य घेतलं जायचं. धान्यातला खडा किंवा पोरकिडा शोधून, लोकं त्यावर बोट ठेवायचं. ते बोट ओढत ओढत ताटाच्या कडेला घेऊन जायचे आणि ती घाण बाहेर फेकायचे. कोणी खडे ताटात ठेवून धान्य बाहेर फेकणारा पहिला आहे का? अशा व्यक्तीला आपण ‘वेडा’ म्हणायचो!

...आपल्या मनाच्या ताटात, पंचेंद्रियाद्वारे अनेक गोष्टी येऊन पडतात. मनात काय साठवलं जातंय हे तपासण्यासाठी, तुमच्या आयुष्यातील सुख, समाधान, आनंद देणारे क्षण आठवून बघा. तसंच तुमच्या आयुष्यातील दुःख, वेदना, मान-अपमानाचे क्षण आठवून बघा. सकारात्मक क्षण जास्त आठवतात की नकारात्मक हे पडताळून पाहा. थोडक्यात, आपल्या मनात ‘धान्य साठवतो आहे की खडे’ याचा उलगडा आपोआपच होईल. म्हणजेच आपण ‘शहाणपणा’ करतो आहे की ‘वेडेपणा’ हेही समजेल! आठवणीतील वाईट गोष्टी बाहेर फेकून द्यायच्या आणि चांगल्या गोष्टी मनात साठवून ठेवायच्या याची सुरुवात करण्याचा संकल्प करूया.

हे वाचा - गुढी पाडव्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या या दिवसाचं वैशिष्ट

मित्राबरोबर गाडीवरून जाताना तुमच्या लक्षात येतं, की त्याची गाडी काळा धूर सोडत प्रदूषण करत आहे. तुम्ही मित्राला याची जाणीव करून देता.  मित्रानं कधी मागं वळून पाहिलेलं नसल्यामुळं त्याची गाडी काळा धूर सोडते आहे हे त्याला प्रथमच लक्षात येतं! 

पहिल्या उदाहरणातील जे लोक नकारात्मकतेचे खडे मनात साठवून ठेवतात, त्यांच्या वागण्या बोलण्यात ‘ काही खरं नाही’ असा नैराश्यवाद असतो. ‘याला बघून घेईन, त्याला बघून घेईन,’ असं म्हणणारे लोकं कधी स्वतःकडं बघतच नाहीत! ही लोकं समाजात वावरत असताना ‘काळा धूर’ सोडणाऱ्या गाडीप्रमाणंच असतात! ते तसे वागत आहेत हे त्यांच्या लक्षातही येत नाही. आपण आपल्या परिचितांना तो ‘नकारात्मकतेचा काळा धूर’ सोडत जगतो आहे जाणीव करून देऊया. समाजातील नकारात्मकतेचे प्रदूषण टाळण्यासाठी आपण प्रयत्न करण्याचा संकल्प करूया.  

गुढीपाडव्याला लोक नव्या घरात राहायला जातात. जुन्या घरात खूप सामान असतं.  ‘कधीतरी लागेल’ असा विचार करून ठेवलेल्या बरण्या, वस्तू, डबे, जुने कपडे, जुनी भांडी  या  व अशा अनेक वस्तू बाहेर पडतात. डोळ्यासमोर ‘नवं घर’ येतं. ‘इंटिरिअर’ला  साजेशा वस्तूच घेऊन जाण्याचं ठरतं... आणि बघता बघता अनेक वस्तू फेकल्या जातात. विकल्या जातात. कोणाला तरी दिल्या जातात. 

हे वाचा - सोनेरी पहाट आणि उंच गुढीचा थाट! अशा पद्धतीनं करा गुढीची शास्त्रयुक्त पूजा; जाणून घ्या

गुढीपाडव्या निमितानं आपण ‘नव्या घरात’ जसे रहायला जातो, तसे आपण स्वतःच्याच ‘नव्या मनात’ राहायला जाऊया ! मनातील नकारात्मकता घालवायला एक गोष्ट करून पाहा. नकारात्मक विचार आला, की तो कागदावर लिहा. नंतर यादी तपासताना त्यातील तोच तोचपणा  लक्षात येईल. मी सकारात्मक जगणार आहे, असा विचार करत ती यादी फाडून टाका.

विचारातील नकारात्मकता घालविण्यासाठी ‘ कागदावर लिहा आणि कागद फाडा’ हा प्रयोग कंटाळा येईपर्यंत सतत करत राहा. काही काळानं नकारात्मक विचार येणं कमी होईल. सकारात्मक विचारांची ‘गुढी’ उभारण्यासाठी ‘मागचं सारं विसरा, चेहरा ठेवा हसरा’ हे सूत्र धरून नव्याने सुरुवात करूया!!!