चेतना तरंग : मन हरवते तेव्हा... 

श्री. श्री. रविशंकर 
Tuesday, 11 August 2020

तुम्ही एखाद्या रस्त्यावरून प्रवास करत असल्यास त्या रस्त्याच्या समोरचा थोडासा भाग तुम्हाला दिसेल, परंतु सगळा रस्ता दिसणार नाही. तेच तुम्ही विमानातून जात असल्यास त्या रस्त्याची सुरुवात आणि शेवटही तुम्हाला दिसेल.

प्रश्‍न कधी नसतात? एखाद्याला बुद्धी नसेल किंवा मन शांतचित्त झालेले असल्यास मनात प्रश्‍न निर्माण होत नाहीत. ही सगळ्यात उत्तम स्थिती असते. बरोबर? कोणाला थोडीही बुद्धी नसणे ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. प्रत्येकाकडे थोडी-फार बुद्धी असतेच. तुम्ही बुद्धीला ओलांडून पलीकडे जाता त्यावेळी मन हळवे आणि निःष्पाप झाल्यावर मनात प्रश्‍न निर्माण होत नाहीत. आणि झाले तरी त्या प्रश्‍नांचे समाधान लहानशा उत्तराने होते. लहान मुलांकडेच बघा, ती मुले तुम्हाला नाना प्रकारचे प्रश्‍न विचारतील, मात्र तुम्ही दिलेल्या उत्तराने त्यांचे लगेच समाधान होईल. मनात निर्माण होणाऱ्या सगळ्या प्रश्‍नांचे रूपांतर आश्‍चर्यात व्हायला पाहिजे. ईश्वर हा बुद्धीच्या पलीकडे असतो. बुद्धीच्या जोरावर ईश्वराला गाठायचा तुम्ही प्रयत्न केलात तर तो कधीही यशस्वी होणार नाही. विचार निर्माण होतात, त्याअर्थी ते कुठेतरी उगम पावतात हे नक्की. तुम्ही एखाद्या रस्त्यावरून प्रवास करत असल्यास त्या रस्त्याच्या समोरचा थोडासा भाग तुम्हाला दिसेल, परंतु सगळा रस्ता दिसणार नाही. तेच तुम्ही विमानातून जात असल्यास त्या रस्त्याची सुरुवात आणि शेवटही तुम्हाला दिसेल. याप्रमाणेच तुमची चेतना ही जास्तीत जास्त प्रसरण पावायला लागल्यावर तुम्हाला भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे संपूर्ण आकलन व्हायला लागेल. या सगळ्या गोष्टी नैसर्गिकरीत्याच होत असतात, त्याला अवास्तव महत्त्व देण्याचे कारण नसते! 

चेतना तरंग - भोवळ (व्हर्टिगो) आणि योगोपचार

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्तमान क्षणात राहणे. मन नेहमी भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये झोके खात असते. मनाचे हे हिंदोळे थांबतात त्यावेळेस काळसुद्धा थांबतो. आपली खरी स्वाभाविक स्थिती हीच असते. पतंग जसा दिव्याकडे आकर्षित होतो, तसेच आपले मन सतत इतर वस्तूंकडे आकृष्ट होत असते. त्यातून काही मिळते आहे का, याचा मागोवा घेत असते. त्यात काही आश्‍चर्यचकित होण्यासारखी गोष्ट आढळल्यास मन त्या गोष्टीचा उगम कशात आहे, याचा पाठपुरावा करायला लागते. मनाला त्या गोष्टीचा उगम समजतो त्या क्षणीच मनाचे अस्तित्व संपते. मनच नाहीसे होते. ध्यान धारणेचे हेच तंत्र आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रामाला भजायचे असल्यास तुम्हाला प्रथम हनुमान बनायला पाहिजे आणि मग रामाला भजायला पाहिजे. हनुमानाच्या मदतीशिवाय राम युद्ध जिंकू शकला नसता. तुम्हाला कोणाचे सेवक बनायचे असल्यास हनुमाना सारखे सेवक बना. तुम्हाला कोणावर प्रेम करायचे असल्यास राधेसारखे प्रेम करा. तुम्हाला तप:चर्या करायची असेल तर पार्वतीसारखी करा. शिवाची पूजा करायची असल्यास प्रथम पार्वती बना आणि मग शिवाची पूजा करा. शिवाला मिळवणे हे एकच ध्येय पार्वतीने आपल्या आयुष्यात जपले होते. त्या ध्येयाने प्रेरित होऊनच ती तप:चर्या करत होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sri-sri-ravishankar writes about Mind

Tags
टॉपिकस
Topic Tags: