नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पात ९१ टक्के पाणीसाठा 

 नांदेड - डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प
नांदेड - डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प

नांदेड - यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. मानार, विष्णुपुरी, येलदरी, सिद्धेश्वर त्याचबरोबर इसापूर हे मोठे प्रकल्पही यंदा शंभर टक्के भरल्यामुळे प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले आहेत.

यंदाच्या वर्षी नांदेड पाटबंधारे मंडळातंर्गत असलेल्या नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील १५२ प्रकल्पात ता. २४ सष्टेंबर अखेर दोन हजार ५१८.३१ दशलक्षघनमीटर म्हणजेच ९१.१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी ता. २४ सष्टेंबरपर्यंत फक्त ९०६.०५ दलघमी म्हणजेच ३२.७९ टक्के एवढाच पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी तिप्पट पाणीसाठा झाला आहे. 

नांदेड जिल्ह्यात ७६ टक्के पाणीसाठा
नांदेड जिल्ह्यात ११२ प्रकल्प असून त्यात सध्या ५६९.९५ दलघमी (७६.३९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी ४७०.४० दलघमी (६३.०५ टक्के) पाणीसाठा झाला होता. मानार प्रकल्पात १३८.२१ दलघमी (शंभर टक्के) तर विष्णुपुरी प्रकल्पही शंभर टक्के अनेकवेळा भरला. त्यामुळे दरवाजे उघडून पाणी सोडून द्यावे लागत आहे. सध्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा सुरु असून ४५.५९ दलघमी (५६.४३ टक्के) पाणीसाठा आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे शुक्रवारी (ता. २५) चार दरवाजे उघडून त्यातून ५६ हजार ६१० क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. नऊ मध्यम प्रकल्पात १३७.०२ दलघमी (९८.५३ टक्के) तर ८८ लघु प्रकल्पात १६९.६१ दलघमी (८८.९० टक्के) पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ७९.५२ दलघमी (४१.८९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. उर्ध्व मानार आणि निम्न मानार प्रकल्पही शंभर टक्के भरल्यामुळे त्याच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. 

हिंगोली जिल्ह्यात ९८ टक्के पाणीसाठा
हिंगोली जिल्ह्यात ३० प्रकल्प असून त्यात ९२९.३७ दलघमी (९८.१३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी फक्त ६८.६८ दलघमी (७.२५ टक्के) एवढाच पाणीसाठा होता. येलदरी धरणात ८०८.१४ दलघमी (९९.८० टक्के) तर सिद्धेश्वर धरणात ६८.६५ दलघमी (८४.८० टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी येलदरीत ३२.४६ दलघमी (४.०१ टक्के) तर सिद्धेश्वर धरणात पाणीसाठाच (शून्य टक्के) झाला नव्हता. २६ लघु प्रकल्पात ५१.८९ दलघमी (९७.८६ टक्के) तर दोन कोल्हापुरी बंधाऱ्यात ०.६९ दलघमी (२०.६० टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 

परभणी जिल्ह्यात ५२ टक्के पाणीसाठा
परभणी जिल्ह्यात नऊ प्रकल्प असून त्यामध्ये ५४.८९ दलघमी (५१.९५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी ७५.५५ दलघमी (७०.५६ टक्के) पाणीसाठा होता. चार उच्च पातळी बंधाऱ्यात ५०.०९ (५०.८६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. तीन लघु प्रकल्पात ३.२० दलघमी (७३.२८ टक्के) तर दोन कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात १.६० दलघमी (५७.२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 

इसापूर धरणही भरले
बाजूच्या यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातही ९६४.१० दलघमी (शंभर टक्के) पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे दरवाजे उघडून नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या वर्षी या धरणात २९२.४२ दलघमी (३०.३३ टक्के) एवढा पाणीसाठा होता. प्रकल्प शंभर टक्के भरल्याने नऊ हजार क्युसेक्स विसर्ग पैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे पैनगंगेसह गोदावरी, पूर्णा, मानार नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com