नांदेडच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षपदी निलेश मोरेंची नियुक्ती

प्रल्हाद कांबळे
Thursday, 15 October 2020

वर्धा येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांची नियुक्ती केली आहे. निलेश मोरे यांनी आपला पोलिस उपाधीक्षक पदाचा प्रशिक्षण काळ नांदेड येथे पूर्ण केला होता.

नांदेड : अतिरिक्त पोलिस अधीक्षक डाॅ. दत्ताराम राठोड यांची नुकतीच अहमदनगर येथे त्याच पदावर बदली झाली होती. त्यांच्या रिक्त जागी बुधवारी (ता. १४) रात्री उशिरा वर्धा येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांची नियुक्ती केली आहे. निलेश मोरे यांनी आपला पोलिस उपाधीक्षक पदाचा प्रशिक्षण काळ नांदेड येथे पूर्ण केला होता.

नांदेडचे नवे अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांची नियुक्ती झाली आहे. गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी राज्य पोलिस सेवेतील पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त या संवर्गातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (ता. १४) ऑक्टोंबर रोजी रात्री उशिरा जारी केले. यात निलेश मोरे यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. श्री मोरे सध्या वर्धा येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. लवकरच ते नांदेडला रुजू होणार असल्याचे समजते. 

पोलिस प्रशासकीय सेवेतील बदली प्रतिक्षाधीन असलेल्यांनाही नियुक्त्या

यासोबतच पोलिस प्रशासकीय सेवेतील बदली प्रतिक्षाधीन असलेल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात परभणीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय आणि हिंगोलीचे योगेशकुमार यांना मुंबई शहर उपायुक्त पदी नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच सांगली जिल्ह्यातून संदीपसिंग गील यांना हिंगोली राज्य राखीव पोलिस बलाच्या समादेशकपदी पाठविण्यात आले आहे. तसेच मंगेश शिंदे यांनाही एसआरपीएफ ग्रुपची जबाबदारी दिली आहे. 

हेही वाचा ह्रदयद्रावक घटना : दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू -

प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गंत, खरीप पिकांचे नुकसान झाल्यास पिकविमा कंपनीस कळविण्याचे आवाहन

नांदेड : जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यातही सर्वत्र पाऊस होत आहे. खरीप पीक कापणी हंगाम नेमका अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिके काढून गोळा न करता शेतातच वाळविण्यासाठी ठेवलेले आहेत. तर काही शेतकऱ्यांचे पीक शेतात उभे आहे. मागील दोन-तीन दिवसात झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे व ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला आहे. त्यांनी विम्यासाठी पुढील प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

अधिसूचित केलेल्या पीक व क्षेत्रातील शेतात पिकाच्या कापणीपासून 14 दिवसांच्या आत गारपीट, चक्रीवादळ, अतिवृष्टी, ढगफुटी व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक स्तरावरुन केलेले पंचनामे नुकसानीस ग्राह्य धरता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी असे कोणाबाबत घडले असल्यास 72 तासाच्या आत याबाबत सूचना विमा कंपनीस किंवा महसूल / कृषि विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान कळवितांना सर्वेनंबर व नुकसानग्रस्त तपशील कळविणे हे बंधनकारक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेवर संयुक्त समिती शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करेल. या पाहणी पथकात विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी जवळच्या माहिती असलेल्या व्यक्तीकडून गुगल प्ले-स्टोअरवरील क्रॉप ईन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. त्यानंतर आपल्या नुकसानीची माहिती त्यात द्यावी. 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of Nilesh More as Additional Superintendent of Police, Nanded