अशोक चव्हाण म्हणाले, काळजी घ्या...काहीही कमी पडू देणार नाही

अभय कुळकजाईकर
Tuesday, 15 September 2020

“माझे कुटूंब - माझी जबाबदारी” या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त मंगळवारी (ता. १५ सष्टेंबर) नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवनगरच्या कुटुंबाशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन ८० खाटाच्या आयसीयू वार्डाची भर पडल्याची माहिती त्यांनी दिली.  

नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात मी स्वत: शासन पातळीवरुन दक्ष असून शासनाकडून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही फक्त तुम्ही स्वत: काळजी घेत आरोग्य विभागाच्या तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला सहकार्य करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १५) केले.  

“माझे कुटूंब - माझी जबाबदारी” या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त त्यांनी नांदेड येथील प्रभाग क्रमांक दहाच्या शिवनगर येथील स्थानिक रहिवासी दत्ता इंगळे व श्रीमती कुसूमबाई दराडे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, प्रभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी मोहमंद बदीयोद्यीन, आशा वर्कस व इतर उपस्थित होते.

हेही वाचा - सगरोळीत शेकडो एकर जमीन गेली पाण्याखाली 

विष्णुपुरीच्या रुग्णालयात ८० खाटा 
विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नुकतेच आपण ८० खाटांचे दोन आयसीयू वार्ड अद्यावत केले आहे. यात ६४ खाटा या आयसीयूच्या तर १६ खाटा या ऑक्सिजनच्या तयार केल्या आहेत. पुर्वीच्या १७० आयसीयू खाटांमधून ही नवी भर पडली असून आता अतीगंभीर जे बाधित आहेत त्यांच्यावर येथे प्राधान्याने उपचार केले जातील, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडला मंगळवारी ३४५ पॉझिटिव्ह तर २१३ कोरोनामुक्त

आरोग्य सेवासुविधेकडे विशेष लक्ष 
दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणेची परिक्षा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत माझ्या वारंवार प्रशासनाशी आढावा बैठका घेत असून आरोग्य सेवासुविधेची कुठलीही कमतरता पडणार नाही यासाठी नियोजन करीत आहे. काही प्रमाणात ऑक्सिजनचा वाहतुकीमुळे थोडा प्रश्नही निर्माण झाला होता. तथापि ऑक्सिजनचा कुठलाही तुटवडा नसून वाढत्या संख्येच्या प्रमाणात त्याचे योग्य व्यवस्थापन जिल्हा प्रशासनामार्फत आता अधिक प्रभावीपणे केले जाईल असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी श्रीमती कुसूमबाई दराडे यांच्याशी संवाद साधतांना सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan said, be careful ... nothing will fall short, Nanded news