वाळू मागा, मिळेल पण चोरी करणाऱ्यांची गय नाही - जिल्हाधिकारी डॉ. विपीन

अभय कुळकजाईकर
Thursday, 15 October 2020

अवैधरित्या वाळूचा उपसा होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले की, आता महसूलसोबतच पोलिस आणि आरटीओ विभागातर्फे वाळू माफियांविरूद्ध संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. वाळूची मागणी करा, शासनाला महसूल भरा आणि लिलावातून वाळू घेऊन जा, पण चोरी केली तर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

नांदेड - जिल्ह्यातील ४२ वाळू घाटांचे लिलाव करण्याची परवानगी मागण्यात आली असून पर्यावरण विभागाने दिल्यानंतर त्याचा लिलाव होईल. तोपर्यंत ज्यांना कुणाला वाळू पाहिजे त्यांनी वाळूची मागणी करावी, त्यानुसार जप्त केलेली वाळू लिलावातून देण्यात येईल. मात्र, अवैधरित्या वाळू चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी (ता. १४) दिला. 

नांदेड जिल्ह्यात यंदाच्या वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची सष्टेंबरअखेरपर्यंतची पिकांच्या नुकसानीची माहिती शासनाला कळविण्यात आली असून त्यासाठी निधीचीही मागणी केली आहे. तसेच आक्टोंबर महिन्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचीही माहिती लवकरच देण्यात येणार आहे. सोयाबीन पिकांचे जवळपास ४७ टक्के नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामेही प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले. 

हेही वाचा - जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल , बुधवारी २५३ कोरोनामुक्त ः ९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले की, शासकीय रुग्णालयात आता खाटा उपलब्ध असून खासगी कोविड सेंटरमध्येही रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे खासगी कोविड सेंटरच्या चालकांसोबत बैठक झाली असून त्यातील काही बंद करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉ. विपीन यांनी सांगितले. बाभळी बंधाऱ्याचे गेट टाकण्यासंदर्भात पालकमंत्री अशोक चव्हाण यांना माहिती देण्यात आली असून महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या झालेल्या करारनुसार त्यांना विनंती करण्यात आली आहे. दोघांच्या सहमतीने याबाबत निर्णय घेण्यात येईल.  त्याचबरोबर शस्त्र परवानासाठी जवळपास ३० अर्ज आले होते. त्यापैकी तीन ते चार जणांनाच परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - परभणी ; थॅलेसिमीयाचे रुग्ण रक्त तुटवड्याने त्रस्त
 

वाळूची मागणी करा
अवैधरित्या वाळूचा उपसा होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले की, आता महसूलसोबतच पोलिस आणि आरटीओ विभागातर्फे वाळू माफियांविरूद्ध संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील घरकुलधारकांसह वाळू कंत्राटदार, बिल्डर्स आदींनी वाळूचा तुठवडा होत असल्यामुळे वाळूची मागणी केली आहे. त्यानुसार नायगाव, बिलोली, मुदखेड आदी ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या वाळूचा लिलाव करुन वाळू देण्याबाबतच्या सूचना तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. वाळूची मागणी करा, शासनाला महसूल भरा आणि लिलावातून वाळू घेऊन जा, पण चोरी केली तर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ask for sand, you will get it but the thieves are not safe - Collector Dr. Vipin, Nanded news