पेरणीसाठी बळीराजा झाला सज्ज

NND11KJP02.jpg
NND11KJP02.jpg

नांदेड : भौगोलिक दृष्ट्या डोंगराळ असलेल्या कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कामे आटोपून खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. काहींना बांधावर तर काही शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून खते, बियाणे बियाणे खरेदी केली आहेत. समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केले आहे.

उपलब्ध ओलाव्यामुळे हळद लागवडीला प्रारंभ
तालुक्यात सिंचनासाठी उपलब्ध असलेले मध्यम, लघू प्रकल्प गतवर्षी तालुक्यात सरासरीच्या १४४ टक्के झालेले पर्जन्यमान. तसेच पावसाळ्याच्या शेवटच्या चरणात पडल्यामुळे मोठ्या पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळीत झालेली वाढ, तसेच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत झालेल्या कामांमुळेही भूजल पातळी टिकून राहण्यासाठी मदत झाली. उन्हाळी हंगामात भुईमूग लागवड केलेल्या क्षेत्रात तसेच पाण्याची सर्वत्र चांगली उपलब्धता असल्याने चालू हंगामामध्ये शेतकरी बांधवांनी  तालुक्यात खरीप हंगामातील कापूस आणि नगदी पिके म्हणून हळद या पिकाची लागवड आता मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. 

सुक्ष्म सिंचनावर कापूस लागवड 
कृषी विभागाने तालुक्यात अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड ठिबक सिंचनावर होईल यादृष्टीने नियोजन केले आहे. शेतकरी बांधवांनी त्याला चांगला प्रतिसाद देऊन जवळपास दोन हजार हेक्टरवर ठिबक सिंचन क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड सुरू केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही लागवड पूर्णत्वाकडे जाणार आहे. उर्वरीत क्षेत्रावरील पेरणी ही पुरेसा पाऊस झाल्यानंतरच होणार आहे. 

खरीप हंगामातील कापूस प्रमुख पिक 
तालुक्यात खरीप हंगामातील कापूस हे प्रमुख पीक असून साधारणता २६ ते २८ हजार हेक्‍टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. या पिकाची चांगली उत्पादकता येण्यासाठी लागवड ठिबक सिंचनावर व्हावी म्हणून कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. शेतकरी बंधूनी त्याला प्रतिसाद देत योजनेतील किंवा योजनेचे बाहेरील अशा दोन्ही पद्धतीने ठिबकवर कापूस पिकाची लागवड करण्याचे काम हाती घेतले आणि येत्या काही दिवसांमध्ये लागवड पूर्ण होणार आहे. स्थिर भूजल पातळीमुळे यंदा शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत.

आंतरपीक लागवडीवर भर
तालुक्यातील शेती कोरडवाहू आहे. या क्षेत्रात फक्त खरीप हंगामात एकच पीक घेतले जाते. एक पीक पद्धती असलेल्या भागात आंतरपिकाची लागवड होते. याही वर्षी अशा क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर आंतरपिकाची लागवड होणार आहे. कृषी विभागामार्फत या वर्षी मोठ्या प्रमाणात याबाबतीत जनजागृती  करण्यात आली. आंतरपीक पद्धतीमध्ये सोयाबीनमध्ये तूर जमीनिच्या प्रतीनुसार ४ :२ किंवा ६ :२ ,ज्वारीमध्ये तूर, कापूस पिकामध्ये तूर तसेच बागायती कापूस या पट्टा पेरणी पद्धतीमध्ये दोन ओळी मूग, उडीद किंवा सोयाबीन अशा पद्धतीची आंतरपीक पद्धती लागवड करण्याकडे शेतकऱ्यांना जनजागृती केल्याने तालुक्यात जवळपास २२ ते२३ हजार हेक्‍टरवर आंतरपीक लागवड खरीप हंगामामध्ये होणार आहे.

सोयाबीनची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी 
सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून पाहण्याबाबत तालुक्यात जनजागृती करण्यात आली. गावोगाव उगवणक्षमता चाचणीचे प्रात्यक्षिके घेऊन त्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. बियाण्याची उगवण क्षमता तपासून घरचं सोयाबीनचे बियाणे वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर उगवणक्षमतेची टक्केवारी पाहून एकरी बियांणांचा वापर त्या प्रमाणात करायचा आहे. सोयाबीनच्या बियाण्याला पेरणीपूर्वी रासायनिक बुरशीनाशक, जैविक बुरशीनाशक तसेच जैविक खते रायझोबियम पीएसबी या घटकांचा बीजप्रक्रियेसाठी वापर करूनच पेरणी करावी. पिकाला रासायनिक खतासोबत चार किलो गंधकाची मात्रा द्यावी. पेरणी रुंद सरी वरंबा पध्दतीने करावी. 

क्राॅपसॅपच्या माध्यमातून कीड, रोगांचे व्यवस्थापन
कृषी विभागामार्फत क्रॉपसॅपची योजना राबविण्यात येत आहे. यावर्षी खरीप हंगामामध्ये प्रमुख पिकांचे प्रत्येक आठवड्यात कीड व रोगांसाठी निरीक्षणे नोंदवून त्यानुसार पिकावरील कीड व रोगाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून किडींचे व रोगांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या सहकार्याने ही निरीक्षणे ऑनलाइन नोंदवली जाणार आहेत. कृषी विद्यापीठाच्या सहकाऱ्यांने उपायोजना शेतकऱ्यांना सांगून कीड व रोगाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन
शेतकऱ्यांना पीक वाढीच्या काळात तालुक्यातील प्रमुख पिकांसाठी शेतीशाळेच्या माध्यमातून बांधावर शेतकऱ्यांना हंगामातील संपूर्ण काळात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तालुक्यात लिंबाची झाडे उपलब्ध आहेत. अशा लिंबोळ्या एकत्र करून याचा भरडा करावा. या भरड्यापासून निमार्क तयार करून कीड नियंत्रणासाठी प्रत्येक फवारणीमध्ये वापर करण्यावर भर राहणार आहे.

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्गदर्शन
कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर फरदड कापूस टाळला. त्याचबरोबर पिकाची लागवड एक जून नंतरच केली. येत्या हंगामातही या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार असून या अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

- रमेश देशमुख
तालुका कृषी अधिकारी, कंधार जि. नांदेड.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com