बंडूनानाला दुपारी जेवण करुन झोपणे पडले महागात...

अभय कुळकजाईकर
Monday, 21 September 2020

बंडूनानाला दुपारी जेवण करुन झोपणे महागात पडले. बंडूनाना ढगे यांनी दुपारी जेवण केल्यानंतर झोपल्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला आणि घरात प्रवेश करुन बंडूनाना यांचे दोन मोबाईल आणि रोख २८ हजार असा २१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. 

नांदेड - नांदेड शहरातील दत्तनगर भागात गोवळवाड्यात बंडूनाना तुळशीराम ढगे (वय ३०, रा. गोरेगाव) हे राहतात. ते नर्सिंगचे काम करतात. जेवण केल्यानंतर दुपारी दीड वाजता ते झोपी गेले. त्यांना डोळा लागल्याचे पाहून चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीतून हात घालून दरवाजाच्या कडी कोंडा काढला आणि घरात प्रवेश केला. घरातील साडेतीन हजार रुपयांचे दोन मोबाईल तसेच रोख २८ हजार रुपये असा एकूण २१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याबाबत बंडूनाना ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नायक लियाकत करत आहेत.

हेही वाचा - पावसाळ्यापुर्वीची थातुरमातुर कामे पथ्यावर, बारा-बारा तास वीज गुल...

कौठ्यात घरफोडीत ५१ हजाराची चोरी
नांदेड शहरातील कौठा येथील पारनेरकर महाराज मंदिराजवळ राहत असलेले संतोष रमेश कुलकर्णी (वय ३२) हे अधिकमास कार्यक्रमानिमित्त त्यांच्या गुरूद्वारा परिसरातील जुन्या घरी शनिवारी (ता. १९) गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख पन्नास हजार रुपये तसेच बाराशे रुपये किंमतीची तेलाचा डबा असा एकूण ५१ हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबत संतोष कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार जावेद शेख पुढील तपास करत आहेत. 

आखाड्यावर बांधलेले ८० हजाराचे बैल चोरीला 
केरूर (ता. मुखेड) येथील तरुण शेतकरी श्रीहरी शिंदे यांनी शनिवारी (ता. १९) रात्री शेतीच्या आखाड्यावर ८० हजाराचे दोन बैल बांधले होते. शनिवारी (ता. १९) रात्री ते रविवारी (ता. २०) पहाटे सहाच्या दरम्यान चोररट्यांनी हे दोन बैल चोरुन नेले. याबाबत श्रीहरी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार धोंडगे करत आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली : पूल नसल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांना काढावी लागते पाण्यातून वाट

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
पाटणूर येथील सुबोध शिवाजी सावळे (वय २६) या मजुराला शनिवारी (ता. १९) विजेचा धक्का बसल्याने उपचारासाठी नांदेडला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याचा मृत्यू झाला. याबाबत अमोल सावळे यांनी दिलेल्या माहितीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bandunana had to go to bed after lunch at a high price ..., Nanded news