श्री चक्रधर स्वामी द्विज गोरक्षण तीर्थस्थानावर हव्यात मूलभूत सुविधा...  

अभय कुळकजाईकर
Sunday, 30 August 2020

नांदेड शहरातील जुना पुलाच्या परिसरात असलेल्या गोदावरीच्या उत्तर काठावरील या तीर्थस्थानाला भेट देण्यासाठी देश, विदेशातील महानुभावपंथीय भाविक भक्त येथे येत असतात. दर पौर्णिमेला या ठिकाणी भाविक भक्तांची मोठी गर्दी असते. सध्या श्री चक्रधर स्वामीची अष्टशताब्दी महोत्सव ता. २० ऑगस्टपासून सुरू झाला आहे. त्यामुळेही या तीर्थस्थळवर भाविकांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळते. 

नांदेड - देशभरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदेड येथील श्री चक्रधर स्वामी पदस्पर्शिद द्विज गोरक्षण तीर्थ स्थानावर मूलभूत सोयी सुविधा पुरवत तेथे स्वच्छता आणि अन्य बाबींकडे लक्ष द्यावे, अशा सूचना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिल्या आहेत. श्री चक्रधर स्वामी द्विज गोरक्षण तीर्थस्थानाच्या अडीअडचणी समजून घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन  यांच्या उपस्थितीत शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीत श्री. चिखलीकर यांनी या सूचना केल्या.

नांदेड शहरात महानुभावपंथीय भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री चक्रधर स्वामी द्विज गोरक्षण तीर्थस्थान येथे मूलभूत सोयी सुविधा नसल्यामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. नांदेड शहरातील जुना पुलाच्या परिसरात असलेल्या गोदावरीच्या उत्तर काठावरील या तीर्थस्थानाला भेट देण्यासाठी देश, विदेशातील महानुभावपंथीय भाविक भक्त येथे येत असतात. दर पौर्णिमेला या ठिकाणी भाविक भक्तांची मोठी गर्दी असते. सध्या श्री चक्रधर स्वामीची अष्टशताब्दी महोत्सव ता. २० ऑगस्टपासून सुरू झाला आहे. त्यामुळेही या तीर्थस्थळवर भाविकांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळते. 

हेही वाचा - Video- उद्धवा, आता तरी उघड मंदिराचे दार; नांदेडमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन 

मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात
गेल्या आठशे वर्षांपासून असणाऱ्या या तीर्थक्षेत्राचा विकास आजही म्हणावा तसा झाला नाही. किंबहुना या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास देतानाच  खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या. श्री चक्रधर स्वामी द्विज गोरक्षण तीर्थस्थान येथे झाडे -  झुडपे आणि काटेरी वृक्षांचा गराडा पडला असल्याने येथे स्वच्छता मोहीम राबवावी. जाण्या-येण्यासाठी चांगला रस्ता तयार करावा शिवाय आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात. अशा सूचना खासदार चिखलीकर यांनी दिले आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून प्लाझ्मा थेरपी उपचार सुरु 

द्विज गोरक्षण येथे घाट बांधण्याचा प्रस्ताव 
द्विज गोरक्षण येथे घाट बांधण्याचा जो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी शासनास पाठवला आहे. तो प्रस्ताव मंजूर करुन घाट बांधावा व सुशोभिकरण करावे, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे प्रयत्न करावेत, अशीही चर्चा झाली. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीस खासदार चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम, भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सारंग चव्हाण, महापालिकेचे उपायुक्त डॉ. बी. डी. बिक्कड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे, महंत नांदेडकर बाबा, अर्चना वाकंड, महंत कन्हेराज बाबा आदींची उपस्थिती होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Basic facilities required at Shri Chakradhar Swami Dwij Reservation Shrine ..., Nanded news