एकरी एक लाख मिळवून देणाऱ्या एरंडीची लागवड करावी- शिवाजीराव शिंदे

प्रल्हाद कांबळे
Sunday, 18 October 2020

तसेच काळा, गुलाबी व कथ्या रंगाचा गहू  आणला आहे, जो  गहू  कॅन्सर, नजर आणि शुगर या आजारांवर गुणकारी आहे ते पण बियाणे मिळणार आहे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी बाभळी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना केले.

नांदेड : बियाणे क्षेत्रात मागील काही काळात मोठी क्रांती झाली असून एकरी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन देणारी एरंडी आणि हरभरा तसेच 75 दिवसात येणाऱ्या हरभऱ्याचे वाण निघाले असून या बियाण्याची लागवड करून आपले दत्पन्न वाढवावे. तसेच काळा, गुलाबी व कथ्या रंगाचा गहू  आणला आहे, जो  गहू  कॅन्सर, नजर आणि शुगर या आजारांवर गुणकारी आहे ते पण बियाणे मिळणार आहे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी बाभळी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना केले.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी संघटनेचे हदगाव तालुक्यात अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात गावभेटींचा कार्यक्रम सुरु आहे. नुकतेच बाभळी येथे शिवाजीराव शिंदे आणि भारतीय मानव कल्याण महासमितीचे तालुकाध्यक्ष नारायणराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रा. बळीराम मुनेश्वर, बालाजी पा.बाभळीकर, प्रल्हाद पा.सूर्यवंशी, शंकरराव नरवाडे, राजू पा.नरवाडे इ. उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना यथोचित मार्गदर्शन केले.

हेही वाचा -  गुड न्यूज ः परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणु येतोय आटोक्यात

नांदेड जिल्ह्यात दोन हजार एकरवर या कापसाची लागवड

कृषी विद्यापीठातील व कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक मंडळी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला सरकारची जोडसुद्धा मिळणे आवश्यक आहे. मागील दोन वर्षांपूर्वी कापसाच्या एचटीबीटी व आरआरबीटी या कापसाचे वाण आणले, परंतु सरकारने शेतकऱ्यांना लावण्यास बंदी घातली. त्यामुळे कोणताही खर्च न करता एकरी पंचवीस क्विंटल ऊत्पादन देणारे कापसाचे वाण लावता आले नाही, पण शेतकरी संघटनेने आंदोलन करून छुप्या पद्धतीने बियाणे मिळवून लागवड केली. यावर्षीसुद्धा नांदेड जिल्ह्यात दोन हजार एकरवर या कापसाची लागवड केली. आता आम्ही आणलेले एरंडी बियाणे बंदी नसली तरी या वाणाचा प्रसार करत नाही. ते काम शेतकरी संघटनेलाच करावे लागत आहे आणि आम्ही ते काम करणारच.

शेतीचे उत्पादन वाढून भारत देश प्रगतीकडे वाटचाल करील

याशिवाय अनेक खाजगी कंपन्यासुद्धा जागतिक स्तरावर मान्यता असलेल्या अनेक पिकांच्या सुधारित वाणांची निर्मिती करत आहेत. परंतु ते वापरण्याची परवानगी शासनाने द्यावयास पाहिजे, तरच या बियाण्यांची निर्मिती करून फायदा होणार आहे. अशा सुधारित वाणांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, तरच शेतीचे उत्पादन वाढून भारत देश प्रगतीकडे वाटचाल करील. आज फाटक्या अर्ध्या कपड्यात व दाढी वाढलेला, वखवखलेल्या चेहऱ्याचा माणूस म्हणजे शेतकरी, अशी शेतकऱ्यांची प्रतिमा तयार झाली आहे. ती पुसून काढून आधुनिक तंत्रज्ञान वापरणारा, यांत्रिक शेती करणारा, सुस्थितीत राहणारा, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांप्रमाणे जीवन जगणारा एक वर्ग म्हणजे शेतकरी असू शकतो, यावर जगाला विश्वास ठेवायला भाग पडले पाहिजे.

येथे क्किल कराजालन्याचा पिस्तुलधारी युवक नांदेड पोलिसांच्या जाळ्यात -

एकरी वीस हजार रुपयांची मदत करायला पाहिजे

मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस, ऊस, ज्वारी, तीळ यासह मूग, उडीद आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी सरकारने कोणताही भेदभाव न करता किंवा पाच एकरपर्यंतची अट न ठेवता सर्वांना एकरी वीस हजार रुपयांची मदत करायला पाहिजे. तसेच विमा कंपन्यांनीसुद्धा हरामीपणा न करता इमानदारीने नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने त्यांच्यावर दबाव ठेवला पाहिजे. यावर्षी केंद्र सरकारनेसुद्धा शेतीक्षेत्रासाठी हात आखडता घेतला असून दरवर्षी देण्यात येणाऱ्या निधीतून कृषीक्षेत्रासाठी तीन टक्के कपात करण्यात आली आहे. सरकारने यात वाढ करायला पाहिजे, अशी अपेक्षा शिवाजीराव शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Castor should be planted to get one lakh per acre Shivajirao Shinde nanded news