सायकलप्रेमींसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतला निर्णय

अभय कुळकजाईकर
Friday, 9 October 2020

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेडमधील सायकलप्रेमींसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला. वाडी बुद्रुक भवानी चौक ते लिंबगावपर्यंतचा मार्ग सकाळी सहा ते नऊ या काळात जड वाहनांसाठी बंद केला आहे. याबाबत नांदेड शहरातील क्रीडाप्रेमी, सायकलपटू व जनतेतून मोठ्या प्रमाणात मागणी केली होती.

नांदेड - ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंग क्रीडा प्रकाराला चालना मिळावी आणि युवक व क्रीडाप्रेमींच्या अंगी क्रीडा कौशल्यासह सुदृढ आरोग्याबाबत जागृती व्हावी, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे सायकलपटूंसाठी आता वाडी (बुद्रुक) येथील भवानी चौक ते लिंबगावपर्यंतचा मार्ग सकाळी सहा ते नऊ या काळात सायकलपटूंसाठी सुरक्षित करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केली आहे. यासंदर्भात नांदेड शहरातील क्रीडाप्रेमी, सायकलपटू व जनतेतून मोठ्या प्रमाणात मागणी केली होती.

नांदेड शहरातील क्रीडाप्रेमी त्याचबरोबर सायकलपटू आणि जनतेने देखील वाडी बुद्रुक ते लिंबगाव या मार्गावर सकाळी जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती. या रस्त्यावरून अनेकजण सकाळी पायी फिरायला जातात. त्याचबरोबर काही जण धावण्यासाठी तर काहीजण सायकलिंग करतात. त्यामुळे सकाळच्या वेळी या रस्त्यावर वर्दळ असते. त्यातच जड वाहने आली तर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही मागणी करण्यात आली होती. 

हेही वाचा - जीवनशैलीच्या बदलासह रुढी-परंपरेलाही छेद, कसा?

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे अध्यक्षतेखाली गुरूवारी (ता. आठ आॅक्टोंबर) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नांदेडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राउत, नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ग. ही. राजपूत, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे उपस्थित होते.  

हेही वाचलेच पाहिजे - गुड न्यूज : मराठवाड्यातून तीन रेल्वे धावणार, प्रवाशांना दिलासा

सर्व जड वाहनास पूर्णपणे प्रतिबंध

बैठकीत विचार विमर्ष केल्यानंतर जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने भावनी चौक (निळा जंक्शन) वाडी (बुद्रुक) पासून लिंबगावपर्यंतचा रस्ता ता. नऊ ऑक्टोंबर ते ता. सहा नोव्हेंबरपर्यंत सकाळी सहा ते नऊ या कालावधीत सायकलींगसाठी सुरक्षित राहिल. या कालावधीत मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ नुसार अत्यावश्यक सेवेची वाहने, शासकीय प्रवासी वाहने, शासकीय वाहने वगळता इतर सर्व चारचाकी व जड वाहनास प्रतिबंधीत असतील. त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून लिंबगाव - नाळेश्वर - वाघी - नांदेड हा मार्ग उपलब्ध असेल. या मार्गावरुन केवळ हलकी वाहने (एलएमव्ही) वगळता उर्वरीत सर्व जड वाहनास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector Dr. for bicycle lovers. The decision was taken by Vipin, Nanded news