जायकवाडीपासून पोचमपाडपर्यंतचे प्रकल्प भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अभय कुळकजाईकर
Monday, 21 September 2020

मराठवाड्यातील जायकवाडी, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर, अप्पर मनार, लोअर मनार आणि उर्ध्व पैनगंगा इसापूर या मोठ्या सात प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे दरवाजे उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील बंधाऱ्यांमध्ये जवळपास शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे ती देखील तुडुंब भरली आहेत.

नांदेड - मराठवाड्यातील जायकवाडी धरणापासून ते बळेगाव बंधाऱ्यापर्यंत आणि पुढे तेलंगणातील पोचमपाड धरणापर्यंत जवळपास सर्वच प्रकल्प तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. नद्या दुथडी भरुन वाहत असल्याने प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील जायकवाडी, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर, अप्पर मनार, लोअर मनार आणि उर्ध्व पैनगंगा इसापूर या मोठ्या सात प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे दरवाजे उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील बंधाऱ्यांमध्ये जवळपास शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे ती देखील तुडुंब भरली आहेत. नांदेड पाटबंधारे विभागाने सोमवारी (ता. २१) सकाळी दिलेल्या अहवालानुसार प्रकल्प आणि बंधाऱ्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्या दुथडी भरुन वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

हेही वाचा - हिंगोली : पूल नसल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांना काढावी लागते पाण्यातून वाट

पोचमपाडही शंभर टक्के भरले
ढालेगाव बंधारा, मुदगल बंधारा, दिग्रस बंधारा, अंतेश्वर बंधारा, डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प, आमदुरा बंधारा, बळेगाव बंधारा जवळपास भरले आहेत. मुळी आणि बाभळी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचबरोबर तेलंगणातील श्रीराम सागर पोचमपाड प्रकल्पही शंभर टक्के भरला असल्यामुळे त्या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

सतर्क राहून सहकार्य करा - सब्बीनवार
जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. तसेच निम्न दुधना प्रकल्पातून पूर्णा नदीत तसेच येलदरी व सिद्धेश्वर प्रकल्पातून पूर्णा नदीत विसर्ग सुरु आहे. माजलगाव प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. त्यात पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. या शिवाय उर्ध्व पैनगंगा प्रकल्प व उर्ध्व मानार प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी केले आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - पावसाळ्यापुर्वीची थातुरमातुर कामे पथ्यावर, बारा-बारा तास वीज गुल...

 
प्रकल्पातील पाणीसाठा आणि टक्केवारी 
क्रमांक प्रकल्पाचे नाव - पाणीसाठा (दलघमी) - टक्केवारी 

 • जायकवाडी - २१३३.९१८ - ९८.२९ 
 • माजलगाव - ३०७.२०० - ९८.४६ 
 • येलदरी - ८०५.०४२ - ९९.४२ 
 • सिद्धेश्वर - ८०.९६० - १०० 
 • अप्पर मनार - ७३.६२८ - ९७.२५ 
 • लोअर मनार - १३७.०८४ - ९९.१८ 
 • उर्ध्व पैनगंगा इसापूर - ९६४.०९९ - १०० 
 • ढालेगाव बंधारा - १२.९६० - ९६ 
 • मुदगल बंधारा - ११.३६० - १०० 
 • मुळी बंधारा - ०.९५० - ९.४४ 
 • दिग्रस बंधारा - २८.६४० - ४५.०५ 
 • अंतेश्वर बंधारा - २१.१६० - १०० 
 • विष्णुपुरी - ४८.४५० - ५९.९७ 
 • आमदुरा बंधारा - २३.२०० - १०० 
 • बळेगाव बंधारा - ४०.७८० - १०० 
 • बाभळी बंधारा - न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व दरवाजे वर 
 • निजामसागर - १४८.९१९ - २९.५४ 
 • पोचमपाड - १८७१.६१२ - ९२.३१ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Completed projects from Jayakwadi to Pochampad ; Warning to the riverside villages, Nanded news