Good News : कोविड-19 पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना दिलासा- एनटीएस  

प्रल्हाद कांबळे
Sunday, 13 September 2020

नीटसाठी भारत सरकारच्या नॅशनल टेस्टींग एजन्सीने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

नांदेड : रविवार 13 सप्टेंबर रोजी सर्वत्र होणाऱ्या नीट NEET (UG) 2020 च्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संघटन असलेल्या नॅशनल टेस्टींग एजन्सीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात कोविड-19 पॉझिटिव्ह (बाधित) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच अटी व शर्तीनुसार स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल, असे म्हटले आहे. याबाबत 11 सप्टेंबर रोजी नीटच्या सल्लागार समितीची बैठक होऊन त्यात कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता नीटच्या परीक्षा सुरक्षित कशा होतील याबाबत सविस्तर चर्चा झाली. जे विद्यार्थी कोविड-19 बाधित आहेत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यावर विचारविमर्श करण्यात आला.

नीट परीक्षेबाबत जी प्रमाणीत कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली त्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेवर अधिक भर देण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राला मास्क, हँडग्लोज (हातमोजे), 50 एमएल पर्यंत सॅनिटायजरची लहान बॉटल, परीक्षा केंद्रात प्रवेश करतांना किमान 6 फुटाचे एकमेकांपासून सुरक्षित अंतर, स्वत:ची पारदर्शक पाण्याची बॉटल हे आरोग्याच्यादृष्टिने आवश्यक असलेले साहित्य घेण्याबाबत सुचविले आहे. याबाबत वेळोवेळी नीटच्या संकेतस्थळावर माहिती दिलेली आहे.

हेही वाचा -  कुठे चाललाय समाज : वंशाला दिवा पाहिजे म्हणून विवाहितेचा छळ -

जे विद्यार्थी कोविड-19 बाधित आहेत अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने येऊ नये

ज्या विद्यार्थ्यांना कोविड-19 ची बाधा झालेली आहे अथवा जे विद्यार्थी कोविड-19 बाधित आहेत अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित पालकांनीसुद्धा याबाबत योग्य ती खबरदारी घेत नॅशनल टेस्टींग एजन्सी यांनी सूचविल्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्राच्या छायाप्रतीसह कोविड-19 बाधित असल्याचा रिपोर्ट / सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र  घेऊन ते नीटच्या संकेतस्थळावर ईमेल करणे बंधनकारक आहे. याबाबत स्वतंत्र तारिख नंतर कळविण्यात येणार आहे. सदर ईमेल हा ncov19@nta.ac.in  या ईमेल आयडीवर पाठवावा, असे आवाहन नॅशनल टेस्टींग एजन्सीचे महासंचालक डॉ. विनीत जोशी यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consolation to Covid-19 positive students nanded news