
नांदेडला शुक्रवारी (ता. २६) दिवसभरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला तर १३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
नांदेड - जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२६) कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गुलजारबाग भागातील एका ६५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या २४ तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४४ झाली आहे.
शुक्रवारी रात्री आठ वाजता आलेल्या अहवालात चार पॉझिटिव्ह रुग्ण वाढले. त्यानंतर पुन्हा आलेल्या अहवालात आणखी नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची दिवसभरातील संख्या १३ झाली आहे. जिल्ह्यात एकूण मृत्यूची संख्या १६ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
हेही वाचा - कोरोनावर मात केल्यानंतर प्रथमच नांदेडला अशोक चव्हाण यांचे आगमन
रुग्ण संख्या ३४४ वर
शहरातील उमर कॉलनी भागातील ५४ वर्षीय पुरुषाचा गुरुवारी (ता.२५) रात्री मृत्यू झाला होता. चोवीस तासाच्या आत जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. मयत झालेल्या रुग्णास उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास आणि मधुमेह हे आजार होते. शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालातील चार रुग्णांमध्ये एक पुरुष ६२ वर्षीय तर तीन महिला (वय ५५, ५८, सहा) यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ३४४ वर पोचली आहे.
तीन रुग्ण झाले कोरोनामुक्त
दरम्यान, शुक्रवारी विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एक तसेच पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील दोन असे तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत २७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सहा जणांची प्रकृती गंभीर
उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यापैकी दोन महिला (वय ५० व ५५) आणि चार पुरुष (वय ३८, ४२, ६७ व ७५) यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
हेही वाचलेच पाहिजे - जयंती विशेष : बहुजनांचे कैवारी : राजर्षी शाहू महाराज
कोरोनाची संक्षिप्त माहिती
सर्व्हेक्षण - एक लाख ४६ हजार ४४४
घेतलेले स्वॅब - सहा हजार ४७
निगेटिव्ह स्वॅब - पाच हजार २४९
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - ३४४
मृत्यू संख्या - १६
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - ५८
रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली संख्या - २७०