नांदेड वाघाळा महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी 

अभय कुळकजाईकर
Tuesday, 20 October 2020

नांदेड वाघाळा महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीचे निवेदन अधिकारी, कर्मचाऱ्यांतर्फे मंगळवारी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना मंगळवारी (ता. २० आॅक्टोंबर) देण्यात आले. येत्या आठवडाभरात याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.  

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या व इतर मागण्यांचे निवेदन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने मंगळवारी (ता. २०) महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना देण्यात आले. 

राज्यातील पनवेल, चंद्रपूर यासह इतर काही ठिकाणच्या महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यामुळे त्या धर्तीवर नांदेड वाघाळा महापालिकेतही सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

हेही वाचा - नांदेडला मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष

आयुक्तांनी केले आश्वस्त
महापालिकेचे करमुल्य निर्धारण अधिकारी अजितपालसिंग संधू, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव, प्रकाश गच्चे, राजेश चव्हाण, डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, डॉ. रईसोद्दीन, रावण सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे, वरीष्ठ लिपिक झुल्फिकार अहेमद आदींनी महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचे निवेदन आयुक्तांना देऊन कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या व प्रश्नावर चर्चा केली. श्री. संधू यांच्या समवेतच्या शिष्टमंडळास आयुक्त डॉ. लहाने यांनी आश्वस्त केले. येणाऱ्या सात दिवसात कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागु करण्यात येईल. तशा पद्धतीने त्रुटींची पुर्तता करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त बाबुराव बिक्कड उपस्थित होते. 

नगरविकास विभागाने दिले पत्र
दरम्यान, माहिती अधिकार तपास समितीचे अध्यक्ष दत्तात्रय अनंतवार यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या तक्रारीवर आयुक्तांनी अभिप्राय सादर करावा, असे शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्षाधिकारी प्रदीप पाटील यांनी कळवले आहे. याबाबत त्यांनी ता. १६ आॅक्टोंबर रोजी एका पत्रान्वये दिले आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - वसुलीसाठी बँकांचा एकही माणूस शेतकऱ्यांकडे फिरकला नाही पाहिजे, याची खबरदारी सरकारने घ्यावी 

विरोधी पक्षनेत्यांनी मागवली माहिती
महापालिकेचे विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांना याबाबत एक पत्र नगरविकास विभागाला दिले आहे. सातवा वेतन आयोगाबाबत त्यांनी त्यात तीन प्रश्न विचारले असून त्याबाबतची माहिती मिळविण्यासाठी ता. १९ आक्टोंबर रोजी पत्र दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for implementation of 7th Pay Commission in Nanded Municipal Corporation, Nanded news