या शहरात मुख्य रस्त्यावरच भरतेय गाढवांची शाळा 

शिवचरण वावळे
Friday, 4 December 2020

अगदी काही दिवसांपूर्वी शहरातील गल्ली बोळात अन चौकासह मुख्य रस्त्यावर मोकाट गाईंचे कळप दाटीवाटीने बसलेली असत. परंतू, सध्या मोकाट गाई दिसेनास झाल्या अन् शहरातील मुख्य रस्त्यावर गाढवांचा वावर वाढला आहे.

नांदेड - शहरातील गजबजलेले रस्ते, त्यावर अस्ताव्यस्त ट्राफिक, दोन्ही बाजुने फेरिवाल्यांचा गराडा अन् त्यात मोकाट जनावरांचा नेहमी असणारा वावर, हे नांदेडचे नेहमीचे चित्र आहे. अशा या गजबजलेल्या रस्त्यावरुन वाट काढणाऱ्या पादचाऱ्यांना नेहमीच जिव मुठीत धरुन रस्त्यावरुन चालावे लागते. त्याचे महापालिकेला मात्र देणे घेणे नाही. मोकाट गायी, कुत्रे अन आता मोकाट गाढवांची जणू शहरातील रस्त्यावर शाळाच भरत आहे. 

अगदी काही दिवसांपूर्वी शहरातील गल्ली बोळात अन चौकासह मुख्य रस्त्यावर मोकाट गाईंचे कळप दाटीवाटीने बसलेली असत. परंतू, सध्या मोकाट गाई दिसेनास झाल्या अन् शहरातील मुख्य रस्त्यावर गाढवांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. 

हेही वाचा- नांदेड : हैदराबाद- जयपूर, सिकंदराबाद- शिर्डी, काकिनाडा- शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरु ​

नदीच्या घाटावरील वाळुचा उपसा बंद

महापालिकेने दिवा बत्ती, पाणी यासोबतच शहराची स्वच्छता आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे अपेक्षित आहे. मात्र महापालिका नेहमीच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरली आहे. सध्या नदीच्या घाटावरील वाळुचा उपसा बंद असल्याने गाढवांना कुठलेही काम नाही. त्यामुळे रिकाम्या गाढवांना बांधुन न ठेवता त्यांना मोकाट सोडुन देण्यात आले आहे. शहरात जिथे - जिथे आठवडे बाजार भरतो, त्या ठिकाणी सडलेल्या पालेभाज्या रस्त्यावर फेकुन दिल्या जातात. त्यामुळे ही मोकाट गाढवे रस्त्यावर फेकलेल्या पाल्याभाज्या खाण्यासाठी येतात. 

मोकाट गाढवांमुळे रहदारीला अडथळा 

पुढे ही मोकाट गाढवे रस्त्याने मनसोक्त संचार करतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतोच शिवाय रस्त्याच्या कडेला असलेले गाढवे अचानक मुख्य रस्त्यावर आल्याने बेसावधपणे चालकांचा तोल जाऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असताना देखील महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. 

हेही वाचले पाहिजे - दुर्दैवी घटना : लग्नाच्या चिंतेने तरुणीने घेतला गळफास

आपघाताला निमंत्रण देणाऱ्या गाढवांना वेळीच आवर घालणे गरजेचे 

शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेले श्रीनगर, शिवाजीनगर, वजिराबाद, नवा मोंढा परिसर, जुना मोंढा, हिंगोली गेट, महाराणा प्रताप चौक, भाग्यनगर रोड अशा महत्वाच्या व वाहनाने गजबजलेल्या रस्त्यावर गाढवांचे कळप दिसून येत आहेत. रस्त्यावर आलेली गाढवे नेहमीच एकमेकांना लाथा मारणे, अच्यानक चावा घेणे, एकमेकांच्या मागे पळ काढणे असे ओंगळवाणे प्रकार करतात. अचानक रस्त्यावर सुरु झालेले धुडघुस थेट रस्त्याच्या मधोमध येते तेव्हा मात्र अनेक दुचाकी, रिक्षाचालक आणि फोर व्हिलर चालक गोंधळुन जातात. गाडी रस्त्याला बाजुला घेण्याच्या नादात पाढीमागुन येणारी गाडी कधी मागुन भिडते कळत देखील नाही अन् किरकोळ अपघात घडतो. तेव्हा गाढवांचा कळप बाजुला निघुन जातो. मात्र दोन वाहन चालकांमध्ये बाचाबाची सुरु होते. रस्त्यावर फिरणाऱ्या गाढवांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही..  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A donkey school on the main road in this city Nanded News