esakal | नांदेडला रिक्त पदांमुळे आरोग्य विभागाची दमछाक, डॉ. भोसीकर यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी पदासह जिल्हा शल्यचिकित्सक पदाचाही तान
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

 मागील आठवडाभरापासून नांदेड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परिणामी अपुरे कर्मचारी असल्याने आरोग्य यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदासह जिल्हा शल्यचिकित्सक पदाचाही भार डॉ. नीळकंठ भोसीकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

नांदेडला रिक्त पदांमुळे आरोग्य विभागाची दमछाक, डॉ. भोसीकर यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी पदासह जिल्हा शल्यचिकित्सक पदाचाही तान

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड ः श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाबाराव कदम सेवानिवृत्त झाल्यापासून डॉ. नीळकंठ भोसीकर यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. १५ आॅगस्टला जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चार हजार ११ एवढी होती. शुक्रवारी (ता.चार) मागील वीस दिवसांतच कोरोनाची रुग्णसंख्या आठ हजार २०१२ अशी दुपटीने वाढली आहे. 

शुक्रवारपर्यंत जिल्हाभरात २५७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्याची गंभीर स्थिती असतानाही शासनाला रिक्त पदभरतीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात शासनाने आरोग्य विभागावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले असून, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करत आहे. मात्र, ज्या ठिकाणी अपुरे मनुष्यबळ आहे, तेथे मात्र त्यांचे लक्ष नाही. परिणामी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नांदेडमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. 

हेही वाचा- सस्पेन्स, ड्रामा, ॲक्शनचा गोड शेवट लग्नबेडीत ​

कोडे उलगडणे अवघड 

नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, बिलोली, कंधार, लोहा, धर्माबाद, उमरी, मुदखेड, हिमायतनगर, किनवट, माहूर आणि मांडवी या १२ ग्रामीण रुग्णालयांचा कारभार प्रभारींवरच सुरू आहे. यामुळे रुग्णालयाचा आणि रुग्णांचा कोरोना काळात बोजवारा उडत आहे. आरोग्य विभागात कुणाचा कुणाला थांगपत्ता लागत नाही. कोविडच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे आणि कोरोनामुळे मृत्यूचा आकडाही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना आजार कधी आटोक्यात येईल आणि आरोग्याची पदे कधी भरली जातील? सामान्य रुग्णांना कधी उत्तम आरोग्य सेवा मिळेल? याचे कोडे उलगडणे सध्यातरी अवघड आहे. 

हेही वाचा- भाच्याचा मृत्यू सहन झाला नसल्याने शंकर- पार्वती देवाघरी, कुठे ते वाचा...? ​

अधिकाऱ्यांची नेमणूक करावी 

जिल्ह्यात सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांच्या बदलीनंतर अंबाजोगाईचे डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची जिल्ह्याची स्थिती समाधानकारक नसल्याचे दिसून येते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रिक्त जागी पूर्णवेळ आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.