esakal | नांदेड महापालिकेत सभापती, उपसभापतींची निवड 
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड महापालिकेत सरिता बिरकले सभापतिपदी तर उपसभापतिपदी ज्योत्स्ना गोडबोले यांची निवड झाली.  

नांदेड वाघाळा महापालिकेत महापालिकेत शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी सरिता बिरकले तर उपसभापतिपदी ज्योत्स्ना गोडबोले यांची शुक्रवारी (ता. १८ सष्टेंबर) बिनविरोध निवड झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी त्यांचे स्वागत केले. या निवडीनंतर येत्या मंगळवारी महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणुक होणार आहे. 

नांदेड महापालिकेत सभापती, उपसभापतींची निवड 

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती यांची ऑनलाइन पद्धतीने निवड करण्यात आली. सभापतिपदी कॉँग्रेसच्या सरिता बालाजी बिरकले यांची तर उपसभापतिपदी कॉँग्रेसच्याच ज्योत्स्ना राजू गोडबोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी (ता. १८) दुपारी ही निवड करण्यात आली. सभेचे पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर होते. बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्वागत केले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, नगरसचिव अजितपालसिंघ संधू, सदाशिव पतंगे यांची उपस्थिती होती. निवडीनंतर उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, सभागृह नेते वीरेंद्रसिंग गाडीवाले, माजी सभापती प्रकाशकौर खालसा, संगीता डक पाटील, रमेश गोडबोले, गीतांजली हटकर, सुरेश हटकर, करणसिंग खालसा, अपूर्वा देशमुख आदींनी त्यांचे स्वागत केले. 

हेही वाचा - विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना धीर द्यावा ः मंत्री उदय सामंत 

महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणुक
दरम्यान, महापौर आणि उपमहापौर या पदासाठी येत्या मंगळवारी (ता. २२) निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवारी (ता. १९) शेवटचा दिवस आहे. त्यासाठी शुक्रवारी (ता.१८) महापौर व उपमहापौरपदासाठी प्रत्येकी दहा अर्ज घेण्यात आले असल्याची माहिती नगरसचिव कार्यालयातून देण्यात आली. यंदाचे महापौरपद ओबीसी महिला गटासाठी राखीव असून त्यामध्ये मोहिनी येवनकर, शैलजा स्वामी, जयश्री पावडे, सुनंदा पाटील, संगीता तुप्पेकर, कौशल्या पुरी, अलका शहाणे, आसियाबेगम अब्दुल हबीब, रेहाना चांदपाशा कुरेशी, मंगला देशमुख यांचा समावेश आहे. या दहा महिला कॉँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या असून त्यापैकी एका महिलेची निवड होणार आहे. त्याचबरोबर ओबीसी महिला प्रवर्गातून भाजपकडून शांताबाई गोरे या निवडून आल्या आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - प्रमोद शेवाळे नांदेडचे नवे पोलीस अधीक्षक, विजयकुमार मगर यांची बदली 

पालकमंत्री अशोक चव्हाण घेणार निर्णय
महापालिकेत कॉँग्रेसची एकहाती सत्ता असल्यामुळे महापौर कॉँग्रेसचाच होणार असून याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण हेच अंतिम निर्णय घेणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या संसर्गाच्या काळात महापौरपदी अनुभवी महिलेला संधी देण्यात यावी, अशी मागणी होत असल्यामुळे आता दहापैकी कोणत्या महिलेची निवड होणार, याची उत्सुकता आहे. त्याचबरोबर महापौरपद नांदेड दक्षिण की उत्तर यावरून उपमहापौर निवडीची शक्यता असून जातीय समीकरणेही तितकीच महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.