नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५१ कोटींचे अनुदान मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाण

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना क्यार व महा चक्रीवादळाचे ५१ कोटी ६५ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५१ कोटींचे अनुदान मिळणार

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - गेल्या वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्यात क्यार व महा या दोन चक्रीवादळांमुळे अवकाळी पाऊस झाला होता. या पावसाने मोठ्या प्रमाणात रब्बी व काही प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५१ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून या अनुदानाचे पुढील आठवड्यापासून वितरण होणार आहे. 

हे अनुदान मिळवून देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना शासनाकडून ही आर्थिक मदत मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरीप हंगामाचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

हेही वाचा - कोरोना ब्रेकिंग - नांदेडला बुधवारी चार महिला रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ३९१ 

रब्बी हंगामात पिके, फळबागांचे नुकसान
मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पेरणी केली. परंतु ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या क्यार व महा या चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात खरीप व मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले होते.

मुख्यमंत्री, पुनर्वसनमंत्र्यांकडे पाठपुरावा
या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी पत्रव्यवहार केला. याचाच परिणाम म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी ५० कोटी ६५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचलेच पाहिजे - आषाढी एकादशी विशेष : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मिळणार पुर्वीचे रुप 

तालुकानिहाय आलेले अनुदान
या आदेशानुसार नांदेड तालुक्यात १४ कोटी २८ लाख, अर्धापूर तालुक्यात पाच कोटी ५९ लाख, मुदखेड तालुक्यात तीन कोटी ४५ लक्ष, कंधार तालुक्यात चार कोटी ६६ लाख, लोहा तालुक्यात आठ कोटी ७५ लाख, देगलूर तालुक्यात सहा कोटी ४५ लाख, मुखेड तालुक्यात चार कोटी १६ लाख, नायगाव तालुक्यात तीन कोटी, बिलोली दोन कोटी ३५ लाख, धर्माबाद एक कोटी १८ लक्ष, किनवट दोन कोटी ६२ लाख, माहूर एक कोटी ४५ लाख, हिमायतनगर दोन कोटी एक लाख, हदगाव चार कोटी २८ लाख, भोकर दोन कोटी ४१ लाख, उमरी एक कोटी ८३ लाख असे एकूण ५० कोटी ६५ लाख रुपयांच्या अनुदानाचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. 

 

loading image
go to top